सांगली : कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सांगली जल्ह्यातील इस्लामपूर (Islampur Lockdown) शहर तीन दिवसांसाठी पूर्णत: लॉकडाऊन करण्यात आलं आहे. इस्लामपूरमध्ये आतापर्यंत 24 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. विशेष म्हणजे सर्व रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत. त्यांच्या संपर्कात जवळपास 400 नागरिक आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण आहे (Islampur Lockdown).
कोरोनाबाधित रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेऊन 29 मार्च ते 31 मार्च या तीन दिवसांसाठी इस्लामपूर शहर पूर्णत: लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या तीन दिवसात किराणा दूकान, दूध आणि भाजीपालाही बंद असणार आहे. फक्त मेडीकल स्टोअर्स एक दिवसाआड सुरु असणार आहेत. हे मेडीकल विषम तारखेला सुरु राहतील. मेडिकल सुरु न ठेवल्यास त्यांच्याविरोधात कारवाई होईल आणि त्यांचे परवाने रद्द केले जातील.
हेही वाचा : Corona : मध्य प्रदेशात BSF जवानाला कोरोनाची लागण, 50 जवानांना क्वारंटाईन
कोरोनाबाधित रुग्णांच्या घरापासून साडेतीन किलोमीटरचा सर्व परिसर सील करण्यात आला आहे. आतापर्यंत 27 इन्स्टिट्यूट क्वारंटाईन करण्यात आल्या आहेत. याशिवाय इस्लामपूरमधील बँका आणि पतसंस्था यांनाही लॉकडाऊनमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान, राज्याचे जलसंपदा मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आणि सरकारच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. याशिवाय शेतकऱ्यांना वाहतुकीसाठी मुभा दिल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, सांगली जिल्ह्यात कोरोनाबाबत उपाययोजना करण्यासाठी तीन डॉक्टरांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सांगलीतील परिस्थितीचा आढावा घेणार आहे. मुंबईच्या जेजे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे या समितीच्या अध्यक्षा आहेत. ही समिती सांगलीत दाखल झाली आहे. डॉ. पल्लवी सापळे यांच्याकडे मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठातापदाचा पदभार देण्यात आला आहे.
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 73 | 12 | 4 |
सांगली | 24 | ||
पुणे | 23 | 6 | |
पिंपरी चिंचवड | 12 | ||
नागपूर | 11 | 1 | |
कल्याण | 7 | ||
नवी मुंबई | 6 | 1 | |
ठाणे | 5 | ||
यवतमाळ | 4 | ||
अहमदनगर | 3 | ||
सातारा | 2 | ||
पनवेल | 2 | ||
कोल्हापूर | 1 | ||
गोंदिया | 1 | ||
उल्हासनगर | 1 | ||
वसई-विरार | 4 | ||
औरंगाबाद | 1 | 1 | |
सिंधुदुर्ग | 1 | ||
पालघर | 1 | ||
जळगाव | 1 | ||
रत्नागिरी | 1 | ||
पुणे ग्रामीण | 1 | ||
गुजरात | 1 | ||
बुलडाणा | 0 | 1 | |
एकूण | 186 | 19 | 6 |