नवी दिल्ली : पुरीच्या जगन्नाथ मंदिर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या काळात बंद असलेलं जगन्नाथ मंदिर आता पुन्हा सुरु करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला असून भाविकांना दर्शनासाठी आता येता येणार आहे. मात्र त्यासाठी त्यांना कोव्हिड 19 निगेटिव्ह असलेला रिपोर्ट प्रशासनाला दाखवावा लागणार आहे. (Jagannath Puri temple reopen Covid 19 Negative report Compulsory)
जगन्नाथ मंदिर प्रशासनाने जगभरातील सगळ्या भाविकांसाठी मंदिर खुलं करुन भाविकांना गुड न्यूज दिलेली आहे. कोरोनाच्या सगळ्या अटी शर्थींचं पालन करुन मंदिर उघडण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाने सांगितलं. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जगन्नाथ मंदिर बंद होतं. जवळपास 9 महिन्यांनंतर हे मंदिर आता सुरु होणार आहे.
जगन्नाथ मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. ज्यामध्ये भाविकांना मंदिरात प्रवेश करताना आपला कोव्हिड 19 निगेटीव्ह रिपोर्ट दाखवावा लागणार आहे. याशिवाय तोंडावर मास्क असल्याशिवाय मंदिरात प्रवेश करता येणार नाही. हाताला वारंवार सॅनिटायजर तसंच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन मंदिर प्रशासनाकडून केलं गेलं आहे.
आजपासून जगन्नाथ मंदिर भाविकांसाठी खुलं झालं आहे. आज अनेक भाविक पुरीत दाखल झाले होते. मात्र काहींचे कोरोना रिपोर्ट त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याने त्यांना मात्र दर्शनापासून वंचित राहावे लागले. जर कोरोना रिपोर्ट नसेल तर दर्शन घेताच येणार नाही, असा कडक नियम मंदिर प्रशासनाने केला आहे.
मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी आम्ही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सगळ्या जणांनी या मार्गदर्शक सूचनांचं पालन करुन प्रशासनाला सहकार्य करायचं आहे, असं आवाहन पुरीचे पोलिस अधिक्षक विशाल सिंह यांनी केलं. मंदिर परिसरात होणारी गर्दी लक्षात घेता 15 विशेष टीमसहित 50 अधिकाऱ्यांना तैनात केलं गेलं आहे, असं एस.पी. विशाल सिंह यांनी सांगितलं.
हे ही वाचा
अहंकार सोडा, राजधर्म पाळा, कृषी कायदे मागे घ्या; सोनिया गांधींचा मोदी सरकारवर हल्ला
मुख्यमंत्र्यांचा विश्वास नांगरे पाटलांना मध्यरात्री फोन, म्हणाले…