नांदेड : सिंचनाची शेती म्हणजे ऊसाची शेती असं समीकरण राज्यात आहे. त्यात नांदेडमध्ये पाण्याची उपलब्धता असली की शेतकरी ऊसाची किंवा केळीची लागवड करत असतो. मात्र गेल्या काही वर्षात ऊस आणि केळीची शेती तितकीशी फायदेशीर ठरत नाही. त्यामुळे अर्धापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने अत्यल्प पाण्यावर येणाऱ्या काबुली चण्याचे पीक घेणं सुरु केलंय. त्यातून शेतकऱ्याने भरघोस उत्पन्न मिळवलं आहे.
अर्धापूर तालुक्यातील देळूब गावाच्या शिवारात सिंचनाची चांगली सोय आहे. या गावात केळी, ऊस असे बारमाही पाणी लागणार पीक मोठ्या प्रमाणात घेतले जायचे. मात्र केळीवर येणारे रोग, गारपीट, वादळी वाऱ्यामुळे होणारे नुकसान, यामुळे हळद आणि केळीचे पीक घेणं अवघड झालं. त्यातच ऊसाला योग्य वेळी कारखाना नेत नसल्याने नुकसान होत असे. त्यामुळे गावातील शेतकरी नूरखान युसुफजई पठाण यांनी मोठ्या प्रमाणावर काबुली हरभऱ्याची पेरणी केलीय. गेल्या काही वर्षापासून 40 ते 50 एकरावर काबुली हरभऱ्याची पेरणी करून नुरखान यांनी लाखो रुपयांची कमाई केलीय.
नूरखान युसुफजई पठाण याचे संयुक्त कुटूंबाची सुमारे 50 एकर जमीन असून ते केळी पीक घेत असत. मात्र या पिकाच्या समस्यांमुळे त्यांनी केळीचे क्षेत्र कमी करुन कमी कालावधीतील सोयाबीन व हरभरा या पारंपरिक हंगामी पिकाकडे ते वळलेत. पठाण यांनी खरिपातील सोयाबीन काढल्यानंतर लगेच काबुली हरभरा पेरले हे त्याचे सातवे वर्ष आहे. हा हरभरा या परिसरात आणला तो त्यांनीच. पहिल्या वर्षी त्यांनी फक्त सहा एकरवर तो घेतला, त्याचे मिळणारे उत्पन्न व दर लक्षात घेऊन पुढील वर्षी जास्त क्षेत्र वाढवत नेले.
सोयाबीनची काढणी झाल्यानंतर जमीन तयार करुन रब्बीमध्ये काबुली हरभरा पेरला जातो या पिकाला थंडी चांगली मानवत असल्याने लवकरच पेरणीला सुरुवात करावी लागते. एकरी सुमारे 55 किलो बियाणे लागते, बियाण्याचे दर 15 हजार रुपये क्विंटल आहेत. काबुली हरभऱ्याचे घाटे एकदम टपोरे असतात दाण्यामध्ये साखरेचे प्रमाणही देशी हरभऱ्यापेक्षा जास्त असते. त्यामुळे खायला तो चविष्ट लागते तसेच सोलायला जास्त कष्ट पडत नाहीत. त्याचा दाणाही देशी हरभऱ्यापेक्षा मऊ असतो. यामुळे यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. त्यामुळे कीड नियंत्रण ठेवण्यासाठी जास्त लक्ष घावे लागते. सुमारे चारवेळा तरी कीडनाशके फवारणी करावी लागते. गेल्या वर्षात 50 एकरमध्ये पठान यांना 700 क्विंटल काबुली चणा झाला होता. चण्याला सरासरी 7000 ते 9000 रुपये भाव मिळतो. काबुली चण्याचे उत्पादन घेत पठाण यांनी आपली आर्थिक प्रगती साधलीय.
पारंपरिक पिकाला फाटा देत पठाण कुटुंबाने नवीन पिकाची कास धरलीय. या काबुली चण्यामुळे पठाण यांच्या घरात आर्थिक सुबत्ता आलीय. घरातील उच्चशिक्षित जुनैद पठान देखील नोकरीच्या मागे लागला नाही. तो स्वतः शेतीत राबत असतो.
सध्या काबुली चण्याची निर्यात बंद आहे. पण ही निर्यात सुरु झाली, तर काबुली चणा प्रचंड महाग विकला जातो. त्यामुळे आता या शेतकऱ्यांना निर्यात सुरु होण्याची प्रतीक्षा आहे. इतक्या मोठ्या जमिनीवर काबुली चण्याची लागवड झाल्यामुळे उत्पादनही मोठं येतंय. मुळात शेतीत प्रयोग करण्याचं धाडस दाखवल्यामुळे पठाण यांना अच्छे दिन आले आहेत. ऊस आणि केळीपेक्षा अत्यल्प पाण्यात येणार हे पीक फायदेशीर असे आहे. त्यामुळे पठाण यांचा हा प्रयोग अनुकरण करण्यासारखाच आहे.