मुंबई : इंग्रज भारतात येण्यापूर्वी जर ‘भारत’ ही संकल्पनाच नव्हती मग ‘महाभारत’ काय आहे? ‘वेद’ काय आहेत? व्यासांनी काय लिहिलं आहे? असे प्रश्न बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने अभिनेता सैफ अली खानला विचारले आहेत (Kangana Ranaut criticize Saif Ali Khan). कंगनाने आपल्या आगामी ‘पंगा’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान हे प्रश्न उपस्थित केले.
“काही लोक त्यानाच योग्य वाटणारे विचार पुढे रेटत असतात. मात्र ही गोष्ट चुकीची आहे. महाभारतात श्रीकृष्णाचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे. सर्व राजांनी एकत्र येऊन त्यांनी लढाई लढली होती. अशा ऐतिहासिक चित्रपटांच्या कथेची आणि भूमिकेची माहिती असणे गरजेचं आहे. तुम्ही तथ्यांसोबत छेडछाड करु शकत नाहीत”, असं कंगना रनौत म्हणाली.
“भारताचं विभाजन फार पूर्वी झालं. मात्र त्याची झळ अजूनही लोकांना बसत आहे”, असंदेखील कंगना रनौत म्हणाली (Kangana Ranaut criticize Saif Ali Khan).
सैफ नेमकं काय म्हणाला होता?
‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटात दाखवण्यात आलेल्या ऐतिहासिक कथेशी सहमत नसल्याचं मत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याने एका मुलाखतीत व्यक्त केलं होतं.
“भारताची संकल्पनाच इंग्रजांनंतर तयार झाली, त्याआधी ही संकल्पना नव्हती असं माझं मत आहे. या चित्रपटात कोणतेही ऐतिहासिक तथ्य नाही”, असं सैफ म्हणाला होता. सैफच्या याच वक्तव्यावरुन कंगनाने टीका केली.
“हे खरं आहे की या चित्रपटात दाखवलेल्या राजकारणाचा तथ्यांशी काहीही संबंध नाही. याच्याशी मी केवळ एक अभिनेता म्हणूनच नाही तर एक भारतीय म्हणूनही सहमत नाही. मी अशा प्रकारच्या राजकारणावर याआधीही प्रश्न उपस्थित केले आहेत. मी पुढच्यावेळी अशा कथांबाबत अधिक सतर्क राहिन”, असं सैफ म्हणाला.
“मला माहिती आहे हा इतिहास नाही. पण मग मी ही भूमिका का केली असाही प्रश्न विचारला जाईल. मात्र, मी या भूमिकेने खूप प्रभावित झालो होतो. असे चित्रपट चालतात असं लोकांना वाटतं, मात्र हे धोकादायक आहे. एकीकडे आम्ही उदारमतवाद आणि विवेकाबद्दल बोलतो आणि दुसरीकडे लोकप्रियतेचा मार्ग निवडतो”, असंही सैफ म्हणाला.