उद्धव ठाकरे सत्ता येते-जाते, एकदा सन्मान गेला तर तो आयुष्यात परत मिळत नाही : कंगना रनौत

| Updated on: Oct 26, 2020 | 9:38 PM

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्ता येते आणि जाते, पण एकदा सन्मान गेला तर तो आयुष्यात परत मिळत नाही", असं कंगना रनौतने म्हणाली (Kangana Ranaut on Uddhav Thackeray speech).

उद्धव ठाकरे सत्ता येते-जाते, एकदा सन्मान गेला तर तो आयुष्यात परत मिळत नाही : कंगना रनौत
Follow us on

मुंबई : “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्ता येते आणि जाते, पण एकदा सन्मान गेला तर तो आयुष्यात परत मिळत नाही. तुम्ही फक्त सरकारी सेवक आहात. महाराष्ट्राची जनता तुमच्यावर खूश नाही”, अशा शब्दात अभिनेत्री कंगना रनौतने शिवसेनेला प्रत्युत्तर दिलं आहे (Kangana Ranaut on Uddhav Thackeray speech).

उद्धव ठाकरे यांनी दसऱ्या मेळाव्यातील भाषणात कंगना रनौतवर नाव न घेता टीका केली होती. या टीकेला कंगनाने ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत प्रत्युत्तर दिलं आहे (Kangana Ranaut on Uddhav Thackeray speech).

“उद्धव ठाकरे तुम्ही मला भाषणात शिवी दिली. याआधीदेखील सोनिया सेनेच्या अनेक लोकांनी मला धमक्या, शिव्या दिल्या आहेत. या लोकांनी मला मारण्याचीदेखील धमकी दिली आहे. पण आता नारीशक्तीचे जे ठेकेदार आहेत ते काहीच बोलणार नाहीत”, असा घणाघात कंगनाने केला.

“पार्वती देवीचा जन्म हिमालयात झाला. त्यांना हिमाचलची पुत्री म्हटलं जातं. हिमालय महादेवांची कर्मभूमी आहे. आजदेखील महादेव आणि पार्वतीदेवीचं इथे वास्तव्य असल्याचं बोललं जातं. मात्र, या भूमीबद्दल तुम्ही तुच्छ भाषा वापरली. मुख्यमंत्री असून तुम्ही संपूर्ण राज्याचा अपमान केला. कारण तुम्ही एका मुलीवर नाराज आहात. याशिवाय ती मुलगी तुमच्या मुलाच्या वयाची आहे”, असं कंगना म्हणाली.

“मुंबईत आझाद कश्मीरच्या घोषणा झाल्या होत्या. तेव्हा तुमच्या सोनिया सेनेने या घोषणा देणाऱ्यांचा बचाव केला. त्यामुळे मी मुंबई पाकव्याप्त काश्मीर असल्याचं बोलले होते. त्यावेळी तुम्ही माझ्यावर खूप नाराज झाले होते. चांगले कायदेपंडीत माझ्याविरोधात उभे राहिले होते”, असा दावा कंगनाने केला.

“पण कालच्या भाषणात तुम्ही भारतवर्षची तुलना पाकिस्तानशी केली. मात्र, आता संविधानाच्या बचावासाठी पुढे येणारे कुणीही येणार नाही. कारण आता त्यांच्या तोंडात कुणीच पैसे भरणार नाही. देशभक्तांना कुणीही मदत करत नाही. पण देश विद्रोहासाठी तोंडात पैसे घातले जातात”, असं कंगना रनौत म्हणाली.

मुख्यमंत्री काय म्हणाले होते?

“मुंबई आणि महाराष्ट्राच मीठ खायचं आणि पुन्हा महाराष्ट्राची बदनामी करायची. महाराष्ट्रात उद्योगधंदे सुरु आहेत. महाराष्ट्र पुढे जातो म्हणून बदनामी केली जात आहे,” अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अभिनेत्री कंगना रनौतचं नाव न घेता दिली.

मुंबई पाकव्याप्त काश्मीर, पाकव्याप्त काश्मीर सोडून द्या, मोदींनी २०१४ ला सांगितलं होतं की पाकव्याप्त काश्मीर भारतात आणू. ते लांब राहिलं. पण ३७० कलम काढलं आहे. त्यानंतर तुम्ही आज तरी अधिकृत एक इंच जमीन काश्मीरमध्ये घेऊन दाखवा. मग आमच्या अंगावर या, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत महाराष्ट्रात यायचं आणि नंतर दाखवायचं की आम्ही कष्ट केले आहे. मुंबई, महाराष्ट्राचं मीठं खायचं आणि नमक हरामी करायची ही असली रावणी औलाद, महाराष्ट्राची बदनामी कशासाठी करायाची. महाराष्ट्रात उद्योगधंदे सुरु आहेत. महाराष्ट्र पुढे जातो म्हणून बदनामी केली जात आहे, असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.

मुंबई पाकव्याप्त काश्मीर मुंबई पोलिस काही काम करत नाही, शिवाजी पार्कात गांजा चरसची शेती आहेत, चरस गांजा उघड विकला जातो. पण त्यांना हे माहिती नाही महाराष्ट्राच्या संस्कृतीत घरासमोर तुळसी वृदांवन आहेत. गांजाची वृदांवन नाहीत. ते तुमच्या घरी गांजाची शेती असेल, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी कंगनाला लगावला.

मी मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचाही कुटुंबप्रमुख आहे. मला त्या पोलीस दलाबद्दल अभिमान आहे. जगातील पोलीस दलात असे एकमेव पोलीस दल आहे, ज्यांनी अंगावर गोळ्या घेऊन अतिरेक्याला पकडलं आहे. केवळ महाराष्ट्र पुढे जातो म्हणून पोलिसांना बदनाम केलं जात आहे. मुंबई पाकव्यापत काश्मीर झालं, असं बोलणं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान आहे. ते पंतप्रधानांचं अपयश आहे. त्या राज्याचा नाही, असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी ठणकावून सांगितलं.

संबंधित बातमी :

मुंबईची पाकिस्तानशी तुलना; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कंगनाला नाव न घेता झापले!