कोल्हापूर : राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे (Kolhapur Corona Update). कोल्हापुरात तर कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. कोल्हापुरात आज (23 मे) दिवसभरात 14 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोल्हापुरातील कोरोनाबाधितांची संख्या 274 वर पोहोचली आहे (Kolhapur Corona Update).
कोल्हापुरात अजूनही 2 हजार पेक्षा जास्त नमुन्यांचे अहवाल येणं बाकी आहे. यातील काही अहवाल रात्री उशिरापर्यंत येतील, असं प्रशानाकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या पाहता हा आकडा लवकरच 300 च्या पुढे जाईल, असा अंदाज आरोग्य विभागाकडून वर्तवला जात आहे.
कोल्हापुरात आज आढळलेल्या रुग्णांमध्ये पन्हाळा, राधानगरी तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे. इचलकरंजीत एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. कोल्हापुरात इतर जिल्ह्यांमधून आलेल्या नागरिकांमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. बरेच रुग्ण रेड झोनमधून आले आहेत. दरम्यान, या रुग्णांमार्फत कोरोनाचं संस्थात्मक संसर्ग झाला नसल्याचं आशादाई चित्र आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात 2 तपासणी केंद्रांच्या माध्यमातून स्वॅब तपासणी केली जात आहे. जिल्ह्यातील 2 हजार पेक्षा जास्त नागरिकांचे अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान, पुणे-मुंबईसह रेड झोनमधून येताना जिल्हा प्रशासनाची परवानगी बंधनकारक केल्याने येणारा ओघ आता बऱ्याच अंशी कमी झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात कालपासून (22 मे) एसटी सेवा सुरु झाली आहे. पहिल्याच दिवशी पाच प्रमुख मार्गावर 17 एसटी बसच्या 24 फेऱ्या झाल्या. कोल्हापुरात काल 184 प्रवाशांनी एसटीने प्रवास केला. दरम्यान, एसटी सेवा सुरु झाली असली तरी लोकांच्या मनात कोरोनाची भीती कायम आहे. त्यामुळे एसटी प्रवासाला दुसऱ्या दिवशीदेखील फारसा प्रतिसाद मिळालेला नाही.
दरम्यान, रिक्षा व्यावसायिकांचीदेखील हीच अवस्था आहे. दोन महिन्यानंतर रिक्षा बाहेर काढूनही प्रवासी नसल्यानं रिक्षाचालकांचं नुकसान होत आहे. दोन महिने रिक्षा थांबून असल्यानं बँकांचे हप्ते भरणं अशक्य होऊन बसलं आहे. त्यामुळे रिक्षा चालक शासनाकडून मदतीची अपेक्षा करत आहेत.
संबंधित बातम्या :
फुले उधळून डिस्चार्ज दिलेल्या महिलेचा रिपोर्ट काही तासात पॉझिटिव्ह, कळंब रुग्णालयाचा कारभार