कोल्हापूर : कोल्हापुरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जवळपास साडेचारशेच्या घरात पोहचली आहे (Kolhapur Corona Update). यापैकी एकट्या शाहूवाडी तालुक्यात 135 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. पुणे-मुंबईसह इतर रेड झोनमधून येणाऱ्या हजारो प्रवाशांमुळे कोल्हापुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली. मात्र, तरीही इतर तालुक्यांच्या तुलनेत शाहूवाडीत मोठ्या प्रामाणात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Kolhapur Corona Update).
शाहूवाडी तालुक्यात कोरोना कसा पोहोचला?
शाहूवाडी तालुक्याचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग हा डोंगराळ आणि पाण्यापासून वंचित आहे. या भागात औद्योगिक वसाहत नसल्याने तरुणांना नोकरीची संधीदेखील कमी आहे. त्यामुळे सैनिक भरती किंवा स्पर्धा परीक्षांवर इथल्या तरुणांची नोकरीची भिस्त असते. मात्र, त्यातही मर्यादा असल्याने अनेक तरुणांना नाईलाजाने पुणे-मुंबईची वाट धरावी लागते.
वृद्ध आई-वडील गावात आणि मुलं नोकरी किंवा छोट्या व्यवसायाच्या निमित्ताने मुंबई-पुण्यात, अशी इथली परिस्थिती आहे. मोठ्या शहरात कोरोनाचं सावट गडद झालं तसं या लोकांनी गावाची वाट धरली. मात्र, दुर्दैव म्हणजे यातील बहुतेक जण कोरोनाला सोबत घेऊनच गावी आले. जिल्हा प्रशासनाच्या नियोजनामुळे त्यांचा सामाजिक संसर्ग झाला नसला तरी इथली कोरोनाबाधितांची संख्या चिंता वाढवणारी आहे.
शाहूवाडी तालुक्यात आतापर्यंत 135 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी तीन रुग्ण दिल्लीच्या मरकजच्या तब्लिगी कार्यक्रमाशी संबंधित आहेत. इतर सर्व रुग्ण मुंबई आणि पुणे शहरातून आले आहेत.
शाहूवाडी तालुक्यात 13 ते 25 मे या कालावधी रेड झोनमधून आलेल्या 4 हजार 434 नागरिकांनी प्रवेश केला. यामध्ये ठाण्याहून 502, पालघरहून 401, मुंबईहून 368, मुंबई उपनगर परिसरातून 82 तर इतर ठिकाणाहून आलेल्या 141 नागरिकांचा समावेश आहे.
शाहूवाडी तालुक्यात रुग्ण वाढीचा टक्का 27 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या दीड महिन्यात 80 हजार पेक्षाही जास्त नागरिक तालुक्यात आले. अजूनही 6 हजार लोक तालुक्यात येणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आणखी रुग्ण संख्या वाढीची भीती आहे.
संबंधित बातम्या :
केवळ 450 रुपयात कोरोना टेस्ट, 5 मिनिटात रिपोर्ट, आव्हाडांच्या पुढाकाराने ठाण्यात चाचण्या
महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीत सुधारणा, मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचा दावा