कोल्हापूर : पाकिस्तानने आज (13 नोव्हेंबर) शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन भारताच्या दिशेला बेछूट गोळीबार केला. पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र, या गोळीबारात महाराष्ट्राने एक वीरपुत्र गमावला आहे. कोल्हापुरच्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावाचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे शहीद झाले आहेत (Kolhapur Jawan Rushikesh Jondhale martyred in Jammu and Kashmir).
ऋषिकेश जोंधळे दोन वर्षांपूर्वी बेळगावमध्ये सैन्यात भरती झाले होते. ते भरती झाल्यापासून जम्मू-काश्मीर येथे सेवा बजावत होते. जोंधळे पुँछ जिल्ह्याच्या सवजियान येथे सीमाभागात तैनात होते. पाक सैन्याकडून शुक्रवारी (13 नोव्हेंबर) पहाटेपासून वारंवार शस्त्रीसंधीचं उल्लंघन केलं जात होतं. पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबाराला उत्तर देताना ऋषिकेश गंभीर जखमी झाले. त्यांना उपचाराठी हेलिकॉप्टरमधून सैन्याच्या दावाखान्यात नेत असताना त्यांचं निधन झालं.
पाकिस्तानकडून सीमाभागात वारंवार गोळीबार सुरु होता. भारतीय जवानांनीदेखील त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र, या गोळीबारात अवघ्या 20 वर्षांचे महाराष्ट्राचे सुपुत्र ऋषिकेश जोंधळे शहीद झाले. जोंधळे शहीद झाल्याची बातमी बहिरेवाडीच्या गावकऱ्यांना संध्याकाळी समजली. त्यानंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली.
पाकिस्तानी सैन्याने आज सीमारेषेवर बारामुल्ला, गुरेज, उरी, कुपवाडा, पुँछ या भागात बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात भारताचे तीन जवान शहीद झाले आहेत. या गोळीबारात काही सर्वसामान्य नागरिकांचादेखील मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानाकडून करण्यात आलेल्या या गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं. भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या 7 ते 8 सैनिकांचा खात्मा केला. तर 10 ते 12 पाकिस्तानी सैनिकांना जखमी केलं. पण या चकमकीत भारताचेदेखील तीन जवान शहीद झाले आहेत. याशिवाय एक भारतीय जवान गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. या जवानाचं नाव वासु राजा असं आहे. या जवानावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
(Kolhapur Jawan Rushikesh Jondhale martyred in Jammu and Kashmir)
संबंधित बातमी : पाकिस्तानचे 10-12 जवान टिपले, भारतीय जवानांची धडाकेबाज कारवाई