मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना यावर्षी भाऊबीज भेट म्हणून दोन हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी याबाबत माहिती दिली (Maharashtra Government gives two thousand rupees Diwali gift to Anganwadi Sevika).
“कोरोना काळात लाखो बालके, स्तनदा मातांना घरपोच आहार पोहचवणे तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. त्यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे; त्यामुळे त्यांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट देण्यात येत आहे”, असं यशोमती ठाकूर यांनी सांगितलं.
राज्यात 93 हजार 348 अंगणवाडी सेविका, 88 हजार 353 अंगणवाडी मदतनीस आणि 11 हजार 341 मिनी अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी 2 हजार रुपये भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. यासाठी 38 कोटी 61 लाख रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली (Maharashtra Government gives two thousand rupees Diwali gift to Anganwadi Sevika).
“कोरोना संकटात लॉकडाऊन काळात अभूतपुर्व परिस्थिती निर्माण झाली असताना बालकांच्या, मातांच्या पोषण आहाराचा, कुपोषणाचा प्रश्न गंभीर होता. यावेळी दुर्गम भागात चालत जाऊन, नावेने नदी पार करत अशा विविध अडचणींवर मात करत अंगणवाडी सेविकांनी घरोघरी पोषण आहार पोहोचवला. स्थलांतरित मजूरांच्या अपत्यांचीही काळजी घेतली. या सगळ्यामुळेच पोषण माह कार्यक्रमात महाराष्ट्राने देशात अव्वल क्रमांक पटकावला”, असं यशोमती म्हणाल्या.
“कोविडमुक्त महाराष्ट्रासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभियानातही घरोघरी जात महत्वाची जबाबदारी महिलांनी बजावली आहे. त्यांच्या कामाचा अभिमान शासनाला आहे. त्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी दिवाळीपूर्वी भाऊबीज भेट देण्यात येत आहे”, असंही यशोमती ठाकूर म्हणाल्या.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये #भाऊबीज भेट देण्याचा शासन निर्णय निर्गमित. #माझेकुटुंब_माझीजबाबदारी मोहिमेत या कर्मचाऱ्यांची मोलाची कामगिरी- महिला व बाल विकास मंत्री @AdvYashomatiINC pic.twitter.com/SC3ME7lmiw
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 12, 2020
हेही वाचा : राजकारणात फादर आणि गॉडफादर लागतो, माझा गॉडफादर दिल्लीत, दानवेंचं ठाकरेंना उत्तर