मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात लॉकडाऊनचा (Maharashtra Lockdown 4.0 Guidelines) कालावधी 31 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्यासह देशभरात चौथ्या सत्रातील लॉकडाऊन सुरु झालं आहे. महाराष्ट्र सरकारने चौथ्या सत्रातील लॉकडाऊनसाठी नियमावली जारी केली आहे. या नियमावलीत लग्न समारंभ आणि अंतिम संस्काराबाबतही महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या दोन्ही कार्यक्रमात आता 50 नातेवाईकांना सहभागी होता येणार आहे (Maharashtra Lockdown 4.0 Guidelines). राज्य सरकारने लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी जारी केलेले नियम 22 मे पासून 31 मेपर्यंत लागू राहतील.
लग्नात 50 नातेवाईकांना सहभागी होण्यास परवानगी
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात आता लग्नासाठीदेखील नियमावली जारी करण्यात आली आहे. लॉकडाऊनदरम्यान लग्न समारंभात 50 नातेवाईकांना सहभागी होता येईल. ‘लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त पाहुण्यांना परवानगी नाही’, असं नियमावलीत स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. याशिवाय लग्न समारंभात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोर पालन केलं जावं, असं सांगण्यात आलं आहे.
देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च महिन्यात लॉकडाऊनची घोषणा केली. पहिला लॉकडाऊन हा 25 मार्च ते 14 एप्रिल असा होता. त्यानंतर पुन्हा लॉकडाऊन वाढवण्यात आला. या काळात अनेक नियोजित लग्न समारंभ रद्द झाले.
अंतिम संस्कारात 50 नातेवाईक सहभागी होण्यास परवानगी
केंद्र सरकारने जारी केलेल्या नियमावलीत याआधी अतिम संस्कारात 20 नातेवाईकांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीत अंतिम संस्कारासाठी 50 नातेवाईकांना सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पुढील गोष्टींना बंदी कायम
1. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमाने सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद राहणार
2. मेट्रोसेवा बंद राहणार
3. शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था, कोचिंग क्लास बंद, ऑनलाईन शिक्षणासाठी प्रोत्साहन
4. हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर आदरातिथ्य सेवा बंद राहणार. केवळ विमानतळ, रेल्वे स्थानक आणि बस डेपोमधील उपहारगृहे, तसेच पोलीस, आरोग्य अधिकारी, सरकारी अधिकारी, पर्यटकांसह अडकलेले मजूर, क्वारंटाईन भागातील उपहारगृहे सुरु
5. सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, ऑडीटोरीअम, थेटर, बार बंद राहणार
6. सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी
7. सर्व धार्मिक स्थळे बंद राहणार
8. सर्व खासगी कार्यालये बंदच राहणार, कर्मचाऱ्यांच्या फोनमध्ये आरोग्य सेतू अॅप असल्याची खातरजमा मालकांनी करावी
सबंधित बातम्या :
Lockdown 4.0 | चौथ्या लॉकडाऊनमध्ये राज्यात काय सुरु, काय बंद?
महाराष्ट्राची रेड झोन आणि बिगर रेड झोनमध्ये विभागणी, रेड झोनमध्ये काय सुरु राहणार?