‘मिशन लसीकरण’; राज्यात कोरोना लसीकरणाच्या कामाला वेग; चांद्यापासून बांद्यापर्यंत जय्यत तयारी!

| Updated on: Dec 09, 2020 | 2:09 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही आठवड्यातच कोरोनाची लस येणार असल्याचं जाहीर केल्यानंतर देशातील सर्वच राज्यांनी कोरोना लसीकरणासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. (maharashtra prepared for Massive corona vaccine)

मिशन लसीकरण; राज्यात कोरोना लसीकरणाच्या कामाला वेग; चांद्यापासून बांद्यापर्यंत जय्यत तयारी!
Follow us on

उस्मानाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही आठवड्यातच कोरोनाची लस येणार असल्याचं जाहीर केल्यानंतर देशातील सर्वच राज्यांनी कोरोना लसीकरणासाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. कोरोनामुळे सर्वाधिक होरपळलेल्या महाराष्ट्रानेही कोरोना लसीकरणासाठी कंबर कसली असून ठिकठिकाणी लसीकरणाची तयारी पूर्ण केली आहे. रत्नागिरी, उस्मानाबाद, पुणे आणि नागपूर या बड्या शहरांमध्ये तर ही तयारी जवळपास पूर्णही झाली आहे. (maharashtra prepared for Massive corona vaccine)

एकीकडे कोरोना लस मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना लसीकरणाची तयारी उस्मानाबाद जिल्ह्यात करण्यात येत आहे. कोरोना लस उपलब्ध झाल्यानंतर ती लस डीप फ्रीजमध्ये ठेवण्यासह ग्रामीण भागात वितरीत करण्याची यंत्रणा सज्ज आहे. लस आल्यावर ती योग्य तापमानासह ठेवून ती लाभार्थी पर्यंत पोहोचविण्याचे सर्व टप्प्याचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. लस साठवणूक, नियंत्रण व वितरणाच्या वेगवेगळ्या टप्याचा डेमो व कार्यपद्धतीबाबत आरोग्य कर्मचारी आणि यंत्रणेला प्रशिक्षण दिले गेले आहे. लस आल्यावर अवघ्या 8 ते 10 दिवसात ती प्रत्यक्ष लोकांना दिली जाण्याची तयारी पूर्ण केल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ कुलदीप मिटकरी यांनी दिली.

उस्मानाबादेत १ लाख डोसची साठवणूक

उस्मानाबाद जिल्ह्यातील एक जिल्हा शासकीय रुग्णालय व एक महिला रुग्णालय, 42 प्राथमिक आरोग्य केंद्रासह 6 ग्रामीण व 4 उपजिल्हा रुग्णालयासह 2 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात शीतसाखळी तयार करण्यात आली आहे. लस ठेवण्यासाठी, 77 ice line फ्रीझर, लस थंड तापमानात साठवून ठेवण्यासाठी 78 डीप फ्रीझर, कोल्ड बॉक्स, व्हॅक्सिन करिअरसह यंत्रणा सज्ज आहे. उस्मानाबाद येथे एका वेळी 20 हजार ते 1 लाख डोस साठवणूक करण्याची क्षमता आहे. तर 8 हजार आरोग्य कर्मचारी यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हनुमंत वडगावे यांनी दिली..

ग्रामीण भागातही लसीचं वितरण

कोरोनाची लस येताच ही लस डीप फ्रिजमध्ये साठवण्यात येईल. योग्य त्या तापमानात ठेवून ही लस लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येईल. ग्रामीण भागातही या लसचं वितरण करण्यात येणार आहे. या लसची साठवणूक, त्याचे नियंत्रण व वितरणाच्या वेगवेगळ्या टप्याबाबतची तयारी पूर्ण झाल्याचे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी यांनी सांगितलं.

असा असणार लसीचा प्रवास

लस आल्यानंतर प्रथम ती 2 ते 8 डिग्री तापमानात ice line रेफ्रिजरेटरमध्ये साठवून ठेवण्यात येणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात असे 77 ILR तयार असून यात एकाचवेळी 20 हजार डोस साठविले जाऊ शकतात. त्यानंतर ही लस – 15 ते – 25 डिग्री तापमानात साठवून ठेवण्यात येते, असे उस्मानाबाद जिल्ह्यात 78 डीप फ्रीज आहेत त्यात ही लस ice पॅकमध्ये ठेवली जाणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात असे 57 कोल्ड चेन पॉईंट लस एकत्रित ठेवण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. या ठिकाणी ठेवलेल्या लसीचे तापमान हे ऑनलाईन पाहता येणार असून त्याची अपडेट माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना मोबाईल अॅपवर मिळणार आहे. डीप फ्रीझरमधील लस प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा लस वितरण ठिकाणी कोल्ड बॉक्समधून पाठविण्यात येणार आहे. या कोल्ड बॉक्समध्ये लस साठवून ठेवण्याची क्षमता 5 ते 20 लिटर इतकी आहे. प्रत्येक केंद्रात असे 3 ते 4 कोल्ड बॉक्स यंत्रणा आहे. कोल्ड बॉक्स जिल्ह्यात पोहचविण्यासाठी एक आयसोलेटेड गाडी ( व्हॅन ) सर्व आधुनिक सामुग्रीनी सुसज्ज असणार आहे. कोल्ड बॉक्समध्ये असलेली लस नंतर वॅक्सिन करिअर अश्या पोर्टबल डब्ब्यात ठेवली जाणार असून त्या डब्यात लस ठराविक तापमानाला साठवून व नियंत्रित ठेवण्यासाठी ice पॅक असणार आहेत. एका व्हॅक्सिन कॅरिअरमध्ये 5 डोस किंवा लस ठेवता येणार असून असे 30 बॉक्स प्रत्येक केंद्रावर ठेवण्यात आले आहेत. अश्या प्रकारे उस्मानाबाद जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.

8 हजार लाभार्थ्यांची यादी तयार

उस्मानाबाद जिल्ह्यात लस आल्यावर सुरुवातीला आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर यांना ही प्राधान्याने दिली जाणार आहे. यासाठी या सर्वांची ऑनलाइन नोंदणी करून ती यादी सरकारकडे सादर केली आहे. लस आल्यावर या लोकांचे आधारकार्ड व इतर पुरावे पाहून त्यांना लस दिली जाणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात किती लस आली, ती कोणाला दिली गेली व शिल्लक लस किती या सर्वांची माहिती ऑनलाईन व रिअल टाईम मिळणार आहे. त्यामुळे सुसूत्रता व नियंत्रण करणे सहज शक्य होणार आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाची स्थिती

उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या कोरोनाचे 183 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजवर 15 हजार 943 रुग्ण सापडले असून त्यापैकी 15 हजार 206 रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत तर 554 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.38 टक्के आहे. तर मृत्यू दर 3.47 टक्के आहे. आजवर 99 हजार 293 रुग्णाची कोरोना तपासणी करण्यात आली असून 15 हजार 943 नमुने म्हणजे 16.06 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. (maharashtra prepared for Massive corona vaccine)

असा आहे उस्मानाबादमधील लसीकरणाचा मेगाप्लान

>> लसीकरणासाठी शीतसाखळी तयार करण्यात आली आहे. या शीतसाखळीत प्लस दोन ते प्लस आठ डिग्री सेल्सिअस तापमानात ही लस ठेवण्यात येणार.

>> ही लस ठेवण्यासाठी आईसलँड रेफ्रिजरेटर (आयएलआर) तयार ठेवण्यात आले आहेत. या आयएलआरचं तापमान दोन ते आठ डिग्री सेल्सिअस एवढं असून त्यात लस ठेवण्यात येणार आहे.

>> प्रत्येक आयएलआरची क्षमता 107 लिटर एवढी असून उस्मानाबादेत असे ५ आयएलआर आहेत. जिल्हास्तरावर सिंगल डोस लस आली तर या आयएलआरमध्ये २० हजार लसची साठवणूक करता येणार आहे.

>> जर कोरोनाचे मल्टिपल डोस आले तर या आयएलआरमध्ये दोन लाख डोस साठवली जाऊ शकते.

>> ही लस ठेवण्यात आलेल्या शीतसाखळीचं तापमान चेक करण्यासाठी थर्मामीटर आहे. शिवाय evin अॅप सुद्धा विकसीत करण्यात आलं आहे. या अॅपचा डॅशबोर्ड जिल्हा स्तरावर ठेवण्यात आला असून मोबाईलद्वारेही त्याचं मॉनिटरिंग केलं जाणार आहे. कोणत्या जिल्ह्यातील शीतसाखळीचं तापमान किती आहे, हे त्यामुळे चेक करणं सोपं जाणार आहे.

>> लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एकूण ५७ शीतसाखळी केंद्र तयार करण्यात आली आहेत. या केंद्रात लस ठेवण्यात येणार आहे. या लससाठी कोल्डबॉक्सही तयार करण्यात आले आहेत. त्यात आईसपॅक ठेवावा लागतो. हा आईस पॅक तयार करण्यासाठी डीफ्रिजर आहे. त्याचं तापमान मायनस 15 ते मायनस 25 डिग्री सेल्सिअस असेल. मायनस डिग्री सेल्सिअस तापमानातील लस आली तर भविष्यात ती या आईसपॅकमध्ये ठेवली जाणार आहे.

>> लस आल्यावर ही लस आधी कोल्ड बॉक्समध्ये ठेवण्यात येणार आहे. या कोल्डबॉक्सचे तापमान 8 डिग्री सेल्सिअनचे असून एकूण 16 कोल्ड बॉक्स जिल्ह्यात आहेत. हे कोल्डबॉक्स प्रत्येकी पाच ते दहा लिटरचे आहेत. त्यात लस ठेवून ही लस शीतसाखळी केंद्रात नेण्यात येईल. त्यानंतर तिथल्या आयएलआरमध्ये ही लस ठेवण्यात येणार आहे.

>> शीतसाखळी केंद्रातून लसीकरण साईटवर ही लस नेण्यात येईल. व्हॅक्सीन कॅरिअरमधून ही लस नेण्यात येणार आहे. लस योग्य तापमानात राहावी म्हणून या व्हॅक्सीन कॅरिअरमध्ये आईसपॅकही ठेवण्यात येणार आहे. या व्हॅक्सीन कॅरिअरचं तापमानही दोन ते आठ डिग्री सेल्सिअस असेल. एकूण 20 ते 25 लस त्यात राहील.

>> दिवसाला किती लसीकरण करायचं हे सरकारच्या गाईडलाईनवर आधारित असेल. जिल्ह्यात एकूण साडेचारशे व्हॅक्सीनेटर आहेत. त्यामुळे दिवसाला साडे चारशे लसीकरण करता येऊ शकतं. पण ते सरकारच्या गाईडलाईनवर अवलंबून असणार आहे.

रत्नागिरीत दिवसाला 10 हजार लोकांना कोरोनाची लस टोचणार

रत्नागिरी जिल्ह्यात 16 लाख कोरोना लस साठवण्यात येणार आहे. तशी तयारीही करण्यात आली आहे. रत्नागिरीत दिवसाला 10 हजार लोकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे, असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. कोरोना लसीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कोरोना तपासणी वाढवण्यात आली असून ती दोन हजारावर नेण्यात आली आहे. तसेच 60 टक्के अँटिजेन टेस्ट आणि 40 टक्के आरटीपीसीआर टेस्टही केल्या जाणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं.

नागपुरात 2661 लसीकरण केंद्र

नागपूरमध्येही कोरोना लसीकरणाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. नागपूरमध्ये 2661 लसीकरण केंद्र तयार करण्यात आली आहेत. मनपा हद्दीत 902 तर ग्रामीण भागात 1759 लसीकरण केंद्र असणार आहेत. नागपूरमध्ये सर्वात आधी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. जिल्ह्यात डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या सुरुवातीला लसीकरण करण्यात येणार असून त्यासाठी 579 परिचारिकांची नोंदणी करण्यात आली आहे. (maharashtra prepared for Massive corona vaccine)

पुण्यात लसीकरणासाठी जिल्हास्तरीय कृती दल

कोरोना लसीकरण मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. या कृती दलात पोलीस अधिक्षक, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, महिला-बालकल्याण विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा प्रशासन अधिकारी, तिन्ही कॅन्टोंमेंटचे कार्यकारी अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी आदींसह शिक्षण, राष्ट्रीय सेवा योजना वगैरे विभाग प्रमुखांचा समावेश करण्यात आला आहे.

पुण्यात 28 दिवसाच्या अंतराने लस देणार

पुण्यात लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात सरकारी आणि खासगी क्षेत्रातील 31,915 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये प्रत्येकी दोन डोस 28 दिवसांच्या अंतराने देण्यात येणार आहे. त्यानुसार आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे. (maharashtra prepared for Massive corona vaccine)

 

संबंधित बातम्या:

केईएम, नायरपाठोपाठ सायन रुग्णालयातही कोरोना लसीची चाचणी, 1 हजार स्वयंसेवकांचा सहभाग

लस प्रभावी आहे हे कसं समजतं? भारतासाठी कोणती लस चांगली?

केंद्र सरकारचा कोरोना लसीचा मेगा प्लॅन तयार, पहिल्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस?

(maharashtra prepared for Massive corona vaccine)