मुंबई : मुंबईच्या माहुल गावातील रहिवासी हे प्रकल्पग्रस्त वसाहतीची दुरवस्था आणि प्रदुषणामुळे होणाऱ्या त्रासाच्या विरोधात संघर्ष करत आहेत. मात्र राज्याचे मुख्यमंत्री असू द्या किंवा इतर प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून माहुलवासियांची व्यथा ऐकून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्नही केला जात नाही.
सीएसएमटीवर रात्रभर ठिय्या
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफार्म क्रमांक 11 वर माहुल गावातल्या प्रकल्पग्रस्तांनी ठिय्या मांडला. आंदोलकांना आजाद मैदानात थांबायला दिलं नाही म्हणून हे सर्वजण प्लॅटफार्मवर येऊन धडकले. माहुल गावात प्रदूषणाचा मुद्दा घेऊन, त्यांचं पुनर्वसन इतर ठिकाणी करण्याची मागणी घेऊन, हे रहिवासी आंदोलन करत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांना माहुलवासियांना भेटण्यास वेळ नसल्याचेच दिसून येते आहे.
प्रकल्पग्रस्त वसाहतीची दुरवस्था आणि प्रदुषणामुळे विविध आजारांनी त्रस्त असलेल्या माहुल येथील प्रकल्पग्रस्तांनी या वसाहतीतून सुटका करण्याच्या मागणीसाठी शनिवारी मुंबईत मोर्चा काढला. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट होऊ न शकल्याने त्यांनी आझाद मैदानात ठिय्या दिला. मुख्यमंत्र्यांची भेट होईपर्यंत आणि मागण्या मान्य होईपर्यंत आझाद मैदानातून हटणार नाही. ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार, असा इशारा माहुलवासींनी दिला आहे.
आपली व्यथा सरकार मुख्यमंत्र्यांकडे मांडण्यासाठी माहूलचे रहिवासी वेळ मागत आहेत. पण आपली बाजू ऐकूनही घेतली जात नाही, असा आरोप आंदोलनकर्ते करत आहेत. न्याय मिळत नाही म्हणून 50 दिवसांपासून विविध प्रकारे माहुलचे रहिवासी आंदोलन करत आहेत. आंदोलनासाठी हे सर्वजण आझाद मैदानात बसले होते. पण कायद्याचा बडगा दाखवून त्यांना तेथून रविवारी हटवण्यात आला. सीएसटीच्या प्लॅटफार्म क्रमांक 18 वर त्यांना थांबण्यासाठी सांगितलं गेलं. पण कडाक्याच्या थंडीमुळे अनेक आंदोलकांची तब्येत बिघडायला लागली म्हणून त्यांना नंतर प्लॅटफार्म क्रमांक 11 वर हलवण्यात आलं.
मेधा पाटकर मैदानात!
प्रदुषणकारी कारखान्यांमुळे माहूल येथे प्रकल्पग्रस्त विविध आजारांनी ग्रासले आहेत. त्या विरोधात त्यांनी मागील तीन महिन्यांपासून लढा उभारला आहे. मागील 50 दिवसांपासून तर रहिवाशांनी आपली समस्या, बाजू मांडण्यासाठी कधी उपोषण तर कधी साखळी आंदोलन सतत करत आहेत. महिनाभरापूर्वी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची भेट घेतली होती. त्यावेळी प्रकल्पग्रस्तांचे तत्काळ कुर्ला येथे पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पुनर्वसनासाठी कोणत्याही प्रकारच्या हालचाली झाल्या नाहीत. सरकारच्या या वेळकाढू धोरणा विरोधात सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे.
When not able to sleep in the chilling night, women and men refused sleeping without shelter. Shifted to railway platform with a shed. @Dev_Fadnavis why such criminal treatment in the middle of night? #Mahul residents ask safe home as per court’s order @fayedsouza pic.twitter.com/oqHMkUpyFt
— Medha Patkar (@medhanarmada) December 16, 2018
मुख्यमंत्र्यांची वेळ मिळावी म्हणून माहुल रहिवाशांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री कार्यालयाला पत्र दिले होते. मात्र त्यांनी वेळ दिला नाही. शनिवारीही भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली नाही. त्यामुळे माहुलवासींनी आझाद मैदानात मुक्काम केला आहे. आपला घरदार सोडून रात्र त्यांना प्लॅटफार्मवर काढावी लागत आहे. आंदोलन शिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. कारण माहुल मध्ये प्रदूषणमुळे लोकांच्या जीव धोक्यात आहे. अनेकांच्या मृत्यू झाल्याचं समोर आला आहे.