नाशिक : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे (Corona update Malegaon). कोरोनाचा प्रादूर्भाव आता राज्यातील विविध जिल्हा आणि तालुक्यांमध्ये वाढू लागला आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगावात आज एका डॉक्टर दाम्पत्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर आणखी 5 जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मालेगावमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 36 वर पोहोचली आहे (Corona update Malegaon).
कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मालेगावात प्रशासनाने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाने मालेगाव शहरात आजपासून (15 एप्रिल) पुढील तीन दिवस म्हणजेच 19 एप्रिलपर्यंत सर्व बँका बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सांचारबंदीची कठोर अंमलबजावणीसाठी मालेगावात राज्य राखीव पोलिस दलाच्या (SRPF) 3 तुकड्या दाखल झाल्या आहेत. तर 700 पोलिसांचा वाढीव पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने शहरात आरोग्य प्रशासनही अधिक गतिमान झालं आहे. शहरातील प्रत्येक घराला आरोग्य कर्मचारी भेट देत आहेत. याशिवाय मालेगाव हा रेड झोन घोषित करावा, अशी मागणी धुळ्याचे खासदार सुभाष भामरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मालेगावात 8 एप्रिल रोजी पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला होता. मृत व्यक्ती ही 51 वर्षीय पुरुष असून ती मालेगांवातील रहिवाशी होती. ते दोन महिन्यांपूर्वी हज यात्रेला जाऊन आल्याची माहिती आहे. त्यांचा कोविड-19 चाचणीचा अहवाल येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांची 8 एप्रिल रोजी सकाळी प्राणज्योत मालवली. सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी ही माहिती दिली होती. मात्र, मृत्यूनंतर या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.
दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 702 वर पोहोचली आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत सर्वाधिक 1 हजार 774 रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 178 कोरोनाबळी गेले आहेत. यात मुंबईत 112 जणांचा कोरोनामुळे जीव गेला आहे.
संबंधित बातम्या :
कोरोनाचे 2 नवे रुग्ण, वसई-विरार परिसरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 वर
नागपुरात एकाच कुटुंबातील तिघे कोरोनामुक्त, पक्षाघात झालेल्या पित्याचीही मात
धक्कादायक! नागपुरात थेट मेडिकल स्टोअर्सधून दारुची विक्री
हँड सॅनिटायझरमध्ये 70 टक्के दारु, नागपुरात नशेसाठी हँड सॅनिटायझरचा वापर