बामाको (माली) : माली देशाची राजधानी बामाकोपासून 15 किलोमीटरवर एक बॉम्बस्फोट झाला (Mali military coup). अनेक राऊंड गोळ्या झाडल्या गेल्या. त्यानंतर अचानक मालीच्या रस्त्यांवर सैन्य उतरतं. सैन्याच्या असंख्य गाड्या राजधानीच्या दिशेनं निघाल्या. हे दृश्यं पाहून देशात काही तरी मोठं घडतंय, याचा अंदाज मालीच्या जनतेला आला (Mali military coup).
राजधानीत शिरताच सैन्यानं सरकारी इमारती घेरल्या. मंत्रालयाबाहेर पहारा उभा केला. अनेक मंत्र्यांना अटकेत घेतलं गेलं. मात्र मंत्र्यांऐवजी विद्रोह करणाऱ्या सैन्याचं खर टार्गेट दुसरचं होतं. ते म्हणजे मालीचे राष्ट्रपती इब्राहिम बुबाकार आणि पंतप्रधान बाऊबो सिसे.
मंत्र्यांच्या अटकेनंतर राष्ट्रपती भवनाबाहेर जमलेल्या गर्दीनं जल्लोष केला. विद्रोह करणाऱ्या सैनिकांचा जयजयकार सुरु झाला. अखेर बंदूक कानाला लावून मालीचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या हातात बेड्या ठोकल्या गेल्या. अशा पद्धतीनं फक्त काही तासात सैन्यानं माली देशात तख्तापलट केला.
हेही वाचा : किम जोंगच्या निशाण्यावर तीन देश, रासायनिक शस्त्रांची कुंडली समोर
सैन्यानं देश हातात घेतल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यासाठी असंख्य लोक रस्त्यांवर जमू लागले. आनंदाच्या भरात जमलेल्या जमावानं राष्ट्रपतींशी निगडीत एक-एक ठिकाणांवर हल्लाबोल सुरु केला. माली देशातल्या कायदा मंत्रालयाचं कार्यालय पेटवलं गेलं. इमारतीत जे-जे किमती साहित्य होतं, ते सर्व लुटून लोकांनी घरी नेलं.
मालीच्या राष्ट्रपतींच्या मुलाचा महलवर सध्या जनतेनं कब्जा केला आहे. राष्ट्रपतींच्या मुलाच्या स्विमिंग पूलमध्ये सामान्यांची मुलं पोहतायत. राष्ट्रपतींच्या मुलाचा शाही महलसुद्धा पब्लिक प्रॉपर्टी झाला आहे.
मात्र, हे सगळं घडलं कश्यामुळे? हा प्रश्न सर्वात मोठा आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, माली देशात वाढलेला भ्रष्टाचार आणि सैनिकांची पगार कपात, या दोन गोष्टी तख्तापलटाला कारणीभूत ठरल्या. सैन्यानं या दोन्ही मुद्द्यांवर आधीपासून सीनियर अधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर थेट राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना अटक केली गेली.
तख्तापलटानंतर खुद्द राष्ट्रपती संध्याकाळी टीव्हीवर आले. टीव्हीवरच त्यांनी स्वतःच्या राजीनाम्याची घोषणा केली. जर सैन्यानंच सरकारविरोधात बंदूक उचलली असेल, तर राजीनाम्याशिवाय कोणताही पर्याय नाही, असं सांगून त्यांनी संसद भंग करण्याचंही सुतोवाच केलं. दुसरीकडे देश ताब्यात घेण्याचा आरोप मालीच्या सैन्यानं फेटाळलाय. सैन्याच्या दाव्यानुसार भ्रष्ट सरकार घालवून लवकरच देशात पुन्हा निवडणुका होतील.
माली देशात इस्लामिक कट्टरपंथी आणि सैन्य, यांच्यातला संघर्ष तसा जुना आहे. 2012 पासून तिथं या दोघांमध्ये खटके उडतायत. मालीच्या तख्तापालटामागे वर-वर भ्रष्टाचाराचं कारण वाटत आहे. मात्र अनेक तज्ज्ञांच्या मतानुसार मालीचं तख्तापलट, हे चीनचं कपट आहे.
अफ्रिकन देशांमध्ये चीननं गुंतवणुकीद्वारे पाण्यासारखा पैसा ओतलाय. त्यात मालीसुद्धा आहे. शांतीसेनेच्या आडून चीननंच मालीच्या सैन्याशी जवळीक केली. म्हणून सैन्याच्या या बंडाला चीनचीच फूस असल्याचं बोललं जातंय. मालीमध्ये चीनच्या असंख्य कंपन्या आहेत. तिथं उत्पादनाच्या आडून चीनचा विस्तारवादी ड्रॅगन पाय पसरतोय.
2012 नंतर माली देशातलं हे दुसरं तख्तापलट आहे. मात्र पहिल्या तख्तापलटानंतरसुद्धा माली देशातली स्थिती सुधारली नाही. याशिवाय भविष्यातही ती सुधारण्याची शक्यता कमी आहे. कारण मालीच्या सैन्यात चीनने स्वतःचे कमांडर पेरुन ठेवले आहेत.