मुंबई: 29 सप्टेंबर 2016 ही तीच तारीख आहे, जेव्हा पाकिस्तानवर पहिल्यांदाच सर्जिकल स्ट्राईक झाला. या सर्जिकल स्ट्राईकने मनोहर पर्रिकरांच्या व्यक्तीमत्त्वाचा दुसरा पैलू जगाने पाहिला. साधेपणाला कमकुवतपण समजू नये हे दाखवणाराच तो पैलू होता. भारतीय सैन्याने 2016 मध्ये 28 – 29 सप्टेंबर दरम्यान मध्यरात्री पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केला होता. या हल्ल्यात भारतीय जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. या हल्ल्यात अनेक दहशतवादी ठार झालेच, शिवाय त्यांची प्रशिक्षण शिबीरही नेस्तनाबूत झाली. या जबरदस्त कारवाईमागे पर्रिकरांची भूमिका महत्त्वाची होती. तज्ज्ञांच्या मते, जर पर्रिकर संरक्षणमंत्री नसते, तर कदाचित सर्जिकल स्ट्राईक इतक्या सहजपणे होऊ शकला नसता.
पर्रिकरांनी सर्जिकल स्ट्राईकची योजना कधी झाली होती हेही सांगितलं होतं. जून 2015 मध्ये मणिपुरात सैन्याच्या ताफ्यावर उग्रवादी संघटना NSCN ने हल्ला केला होता. त्यामध्ये 18 जवान शहीद झाले होते. तेव्हापासूनच सर्जिकल स्ट्राईकची योजना सुरु झाली होती.
माजी संरक्षणमंत्र्यांनी म्हटलं होतं, पश्चिमी सीमेवर 29 सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या सर्जिकल स्ट्राईकची तयारी 9 जून 2015 पासून सुरु झाली होती. आम्ही त्याची तयारी 15 महिने आधीच केली होती. त्यासाठी अतिरिक्त सैनिकांना प्रशिक्षित केलं होतं. तातडीने उपकरणं खरेदी केली होती.
DRDO ने विकसित केलेल्या वेपन लोकेटिंग रडारचा प्रयोग पहिल्यांदा सप्टेंबर 2016 मध्ये केला होता. पाकिस्तानी सैन्याच्या फायरिंग युनिट्सचा शोध घेण्याच्या हेतूने त्याचा वापर करण्यात आला. त्यानंतर तीन महन्यांनी त्याचा सैन्यदलात अधिकृत समावेश करण्यात आला.
संरक्षण मंत्रालय हे आंतरराष्ट्रीय कूटनितीच्या यशस्वीतेसाठी बॅकरुमची भूमिका पार पाडत असतं, असं पर्रिकरांचं म्हणणं होतं. हे काम संरक्षण मंत्रालय यशस्वीपणे करु शकतं आणि त्याने ते करायलाच हवं, असं पर्रिकर म्हणत.
पर्रिकर म्हणाले होते, “मला हे सांगायला अभिमान वाटतो की, मी उरी दहशतवादी हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईक दरम्यान जवळपास 18-19 बैठका घेतल्या असतील. यामध्ये सैन्यदलाचे वरिष्ठ अधिकारी, संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीही सहभागी होते. त्या बैठकीचा कोणताही तपशील लीक झाला नाही. जेव्हा तुम्ही कुणाला काहीही सांगत नाही, तेव्हा तुमच्यावरचा दबाव वाढत असतो. सामान्यत: हा दबाव कोणत्यातरी मित्राशी चर्चा करुन हलका होऊ शकतो. मात्र संरक्षणमंत्री म्हणून तुम्ही कोणत्याही मुद्द्यावरुन कोणाशीही चर्चा करु शकत नाही. मग तो म्यानमारचा सर्जिकल स्ट्राईक असो किंवा मग पाकव्याप्त काश्मीरमधील असो. या दबावामुळे मी निवांत झोपूच शकत नव्हतो.”
सर्जिकल स्ट्राईकची योजना बनवण्यादरम्यान मोबाईल स्विच ऑफ करुन 20 मीटर लांब ठेवले जात होते, असं पर्रिकरांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. गोपनियतेसाठीच मोबाईल लांब ठेवले जात होते. जर मोबाईल जवळ ठेवले असते, तर प्लॅन लीक होण्याचा धोका होता. या गोपनियतेमुळेच पर्रिकर सर्जिकल स्ट्राईकच्या दिवशीही कॅमेऱ्यासमोर दिसले, मात्र त्यांच्या मनातील राज कोणीही ओळखू शकलं नाही.
पर्रिकरांनी सर्जिकल स्ट्राईकमध्ये आपल्या भूमिकेबद्दल सांगितलं होतं. ते म्हणाले होते पंतप्रधान मोदी आणि मी वेगवेगळ्या राज्यातून येतो, मात्र सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेण्यामागे संघाची शिकवण हा आमच्यातील समान दुवा आहे.
ते म्हणाले होते, मला या योगायोगाचं आश्चर्य वाटतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महात्मा गांधींच्या गुजरातमधून आले आहेत आणि संरक्षण मंत्री म्हणून मी गोव्यातून आलो आहे. मात्र इथे कोणताही सर्जिकल स्ट्राईकसारख्या घटना घडल्या नाहीत. संघाची शिक्षा याचं मूळ असू शकतं. मात्र हा अनोखा योगायोगा होता.
पर्रिकरांच्या या वक्तव्यावरुन ते संघशिक्षेशी किती जोडले होते हे दिसून येतं. शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी ती संघशिस्त पाळली. शेवटच्या क्षणापर्यंत ते काम करत राहिले… त्यांनी आपला एक एक श्वास देशाला समर्पित केला.