पुणे : आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाकडून येत्या 8 डिसेंबरला मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या आज (29 नोव्हेंबर) पुण्यातील बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, या बैठकीत आंदोलन करावं की न करावं या मुद्द्यावरुन मराठा समन्वयकांमध्येच बाचाबाची झाली (Maratha Kranti Morcha Pune Meet).
पुण्यात आज सकाळपासून मराठा समन्वयकांची बैठक सुरु आहे. या बैठकीला राज्यातील सर्व मराठा समन्वयक उपस्थित होते. ही बैठकी निर्णायक असल्याचं सांगण्यात आलं होतं. मराठा आरक्षणासाठी पुढे आंदोलनाची दिशा कशी असावी, हे ठरवण्यासाठी आजची बैठक आयोजित करण्यात आली. मात्र, आंदोलन करावं की करु नये या निर्णयावरुन काही समन्वयकांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे काही वेळ बैठकीत गोंधळाचं वातावरण होतं.
काही समन्वयक आंदोलन करण्यावर ठाम होते तर काही आंदोलन न करता समन्वयाने शांतपणे आपला मुद्दा सरकारपर्यंत पोहचवता येईल, अशी काही समन्वयकांची भूमिका होती. यावरुन बैठकीत काही वेळ गोंधळ झाला. थोड्या वेळाने हा गोंधळ शांत करण्यात आला. त्यानंतर पुन्हा बैठकीला सुरुवात करण्यात आली.
या बैठकीत राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नसल्याचा आरोप करण्यात आला. आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत येत्या 8 डिसेंबरला मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे 8 डिसेंबरला मुंबईत मराठा मोर्चा धडकण्याची शक्यता आहे (Maratha Kranti Morcha Pune Meet).
बैठकीला खासदार संभाजीराजेही उपस्थित
या बैठकीला खासदार संभाजीराजे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. याबाबत त्यांनी आपल्या अधिकृत फेसबुर अकाउंटवर माहिती दिली आहे. “मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची निर्णायक बैठक आज पुण्यात आयोजित करण्यात आली होती. पूर्वनियोजीत कार्यक्रमामुळे या बैठकीला प्रत्यक्ष उपस्थितीत राहू शकलो नाही. पण व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होऊन माझे मत मांडले. या बैठकीत समाजाच्या वतीने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असून, आरक्षणासाठीचा लढा तीव्र करण्यात येणार आहे. या बैठकीसाठी मराठा क्रांती मोर्चा, विविध संघटनांचे प्रतिनिधी, जेष्ठ विधीज्ञ उपस्थित होते”, असं संभाजीराजे यांनी फेसबुकवर सांगितलं.
हेही वाचा :
मंडल आयोग लागू करताना मराठा समाजाचा विचार का झाला नाही; उदयनराजेंचा सवाल