देहरादून : पुलावामा हल्ल्यातील मास्टरमाईंडसोबत पिंगलान भागात चकमक सुरु असताना 55 राष्ट्रीय रायफल्सचे पाच जवान शहीद झाले. यात मेजर विभूती शंकर डोंडियाल सुद्धा शहीद झाले. शहीद मेजर विभूती यांच्या पार्थिवाची ज्यावेळी देहरादूमध्ये अंत्ययात्रा सुरु करण्यात आली, त्यावेळी शहीद मेजर विभूती यांच्या पत्नी निकीता कौल यांचे अश्रू थांबता थांबत नव्हते. अशातही वीरपत्नी निकीत कौल शहीद मेजर विभूती यांच्या पार्थिवाजवळ गेले आणि त्यांना स्पर्श करुन अश्रू ढाळतच म्हणाले, “आय लव्ह यू”.
मेजर विभूती शंकर डोंडियाल आणि निकीता कौल यांचं गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात लग्न झालं होतं. निकीता कौल या काश्मिरी विस्थापित होत्या. 34 वर्षीय मेजर विभूती 11 वर्षांपूर्वी म्हणजे 2008 साली सैन्यात दाखल झाले. आजी, आई, तीन बहिणी आणि पत्नी असं मेजर विभूतींचं कुटुंब आहे.
उत्तराखंडची राजधानी देहरादून दु:खाच्या महासागरात आहे. दोनच दिवस आधी पुलवामा हल्ल्यानंतर आयईडी डिफ्युज करताना मेजर चित्रेश शहीद झाले. त्या दु:खातून देहरादून सावरत नाही, तोच पुलवामातील पिंगलान येथे पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाईंडसोबत चकमकीत मेजर विभूती शंकर डोंडियाल शहीद झाले.
शहीद मेजर विभूती यांचे पार्थिव देहरादूनला आणल्यानंतर अंत्ययात्रा सुरु झाली. संपूर्ण परिसर ‘भारत माता की जय’च्या घोषणाने दुमदुमू लागला. शोकसागरात बुडालेल्या गर्दीतून वीरपत्नी निकीता पुढे आल्या आणि शहीद मेजर विभूती यांच्या चेहऱ्याला स्पर्श करत म्हणल्या, “आय लव्ह यू!”
वीरपत्नी निकीता यांचा तो क्षण पाहणाऱ्यांना अश्रू अनावर झाले. अवघा परिसर हळहळ व्यक्त करु लागला. तेवढ्यात सैनिकांनी पुन्हा घोषणा दिल्या, ‘भारत माता की…जय’ आणि वीरपत्नी निकीता यांनी शहीद मेजर विभूती यांना सलाम ठोकला.
जम्मू-कास्मीर येथील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी जैश-ए-मोहम्मद या क्रूर दहशतवादी संघटनेने आयईडी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार सीआरपीएफच्या ताफ्यातील एका गाडीला ठोकली आणि आत्महघातकी स्फोट घडवला. यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी मेजर विभूती यांच्या नेतृत्त्वात चार दिवसांनंतर म्हणजे काल (18 फेब्रुवारी) पिंगलान येथे चकमक झाली. या चकमकीत मेजर विभूती शंकर डोंडियाल यांच्यासह पाच जवान शहीद झाले.