Cyclone Nisarga | कोकणात हाहा:कार, आंबा, फणस, सुपारीची झाडं जमीनदोस्त, अनेक घरांची पडझड

| Updated on: Jun 04, 2020 | 3:15 PM

निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका रत्नागिरी जिल्ह्याला बसला. दक्षिण रत्नागिरीतील गुहागर, दापोली आणि मंडणगड या तालुक्यात प्रचंड नुकसान झालं आहे (Massive damage in Konkan due to Nisarga cyclone).

Cyclone Nisarga | कोकणात हाहा:कार, आंबा, फणस, सुपारीची झाडं जमीनदोस्त, अनेक घरांची पडझड
Follow us on

रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका रत्नागिरी जिल्ह्याला बसला आहे. दक्षिण रत्नागिरीतील गुहागर, दापोली आणि मंडणगड या तालुक्यात प्रचंड नुकसान झालं आहे (Massive damage in Konkan due to Nisarga cyclone). वेगवान वाऱ्यामुळे फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांची घरांची छते उडून गेली. नुकसानीचा आकडा कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

निसर्ग चक्रीवादळाचा प्रभाव काल (3 जून) संध्याकाळपर्यंत होता. चक्रीवादळाचे केंद्रबिंदू अलिबाग असल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड, दापोली, गुहागर या तालुक्यांना मोठा फटका बसला. वेगवान वाऱ्यामुळे अनेक गावं उद्ध्वस्त झाली. एकीकडे मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे घरावरची कौले, पत्रे कागदासारखी उडून जमिनीवर कोसळत होती (Massive damage in Konkan due to Nisarga cyclone).

लोक उघड्या डोळ्यांनी आपलं घरदार उध्वस्त होताना पाहत होती. हे चित्र मंडणगड, दापोली, गुहागर या तीन तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाहायला मिळालं. विजेचे खांब कोसळल्यामुळे वीज पुरवठा खंडीत झाला आहे. मोबाईल टॉवर पडले आहेत. अनेक ठिकाणी घरांवर झाडं पडली आहेत.

जिल्हा प्रशासनाने तात्काळ पंचनामे करायला सुरुवात केली आहे. दापोली तालुक्यातील कजिवली येथील मनोहर चव्हाण यांच्या काजू, आंब्याच्या झाडांचे मोठं नुकसान झालं आहे. हर्णे बंदराजवळील नाडे गावात सुमारे 80 घरांचं या वादळात नुकसान झालं आहे.

पाजपंढरीतील दोन जण वादळात जखमी झाले आहेत. आगरवायगणी येथील विरेंद्र येलंगे यांचा एक बैल तर आंजर्लेतील राजेश बोरकर यांच्या गायीचा मृत्यू झाला आहे. आंजर्लेतील मंगेश महाडिक यांच्या सुमारे 48 कोंबड्या मृत पावल्या आहेत. आवाशी येथील 6 घरांचे नुकसान झालं आहे. जालगाव येथील नरेंद्र बर्वे या बागायतदाराचे मोठं नुकसान झालं आहे. सुमारे 500 पोफळी, 20 आंबा कलमे, सहा फणस झाडे पडली आहेत. वाऱ्यामुळे झाडावरील आंबा जमिनीवर पडून नुकसान झालं आहे.

या वादळाचा फटका किनारपट्टी भागातल्या लोकांना जास्त बसला. किनारपट्टी भागात मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानीचा आकडा सध्या सांगणं कठीण आहे. मात्र दापोली तालुक्यातील अनेक भागात गेल्या 48 तासांपासून वीज गायब आहे. अजून दोन ते तीन दिवस इथं वीज येणं कठीण आहे.

2009 साली आलेल्या फयान वादळापेक्षाही जास्त नुकसान यावेळी झालं आहे, असं इथले अनेक नुकसानग्रस्त सांगत आहेत. दापोली तालुक्यातील एकाच घरावर दोन झाडं कोसळली. निसर्ग चक्रीवादळाचा कहर दक्षिण रत्नागिरीत अनुभवायाला मिळतोय. फयाननंतर पुन्हा एकदा चक्रीवादळाचा तडाखा बसला. पण यावेळचं वादळ हे कोकणी माणसावर वेदनांचे घाव अधिक घट्ट करुन गेलं आहे.

संबंधित बातम्या :

चक्रीवादळाचा फटका ही अफवा, बीकेसीतील कोव्हिड 19 रुग्णालय दणक्यात उभं : महापालिका

Maharashtra Rains | चक्रीवादळ ओसरले, पाऊस पसरला, मुंबई-ठाणे-पुण्यात मुसळधार