जळगाव : जळगावच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या 82 वर्षीय कोरोनाबाधित आजीचा मृतदेह आठ दिवसांनी रुग्णालयाच्या बाथरुममध्ये सापडला आहे (Missing Corona Patient body found in hospital toilet). या घटनेतून जळगावच्या जिल्हा रुग्णलयाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
भुसावळच्या मालती नेहते या 82 वर्षीय आजींची 1 जून रोजी प्रकृती बिघडली होती. त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी जळगावच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, 2 जून रोजी त्या रुग्णालयातून अचानक बेपत्ता झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने मालती नेहते यांचे नातू हर्षल नेहते यांना दिली.
हर्षल नेहते यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली. अखेर आठ दिवसांनंतर पोलिसांनी हर्षल नेहते यांना त्यांच्या आजीचा मृतदेह रुग्णालयाच्या बाथरुममध्ये सापडल्याची माहिती दिली. याबाबत हर्षल नेहते यांनी एक व्हिडीओ जारी करत सविस्तर माहिती दिली आहे. हा व्हिडीओ भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये हर्षल नेहते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हर्षल नेहते नेमकं काय म्हणाले?
जळगाव शासकीय रुग्णालय प्रशासनाकडून 2 जून रोजी आजी बेपत्ता झाल्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर आम्ही पोलिसांत तक्रार केली होती. अखेर आठ दिवसांनी पोलिसांचा फोन आला की, आजीचा मृतदेह रुग्णालयाच्याच बाथरुममध्ये सापडला आहे. जळगाव जिल्हा रुग्णालयात प्रशासनाचा मोठा गोंधळ आहे. आठ दिवसांनी दुर्गंध यायला लागल्यानंतर मृतदेह बाथरुममधून बाहेर काढण्यात आला. ही खूप गंभीर बाब आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती आहे की, याप्रकरणी जे कुणी दोषी असतील त्यांच्याविरोधात तातडीने कारवाई व्हावी.
Harshal Mehte says his grandmother died due to criminal negligence @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra pic.twitter.com/AJR4MhhwaZ
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 10, 2020
नुकतेच केईएम रुग्णालायतून अचानक 75 वर्षीय कोरोनाबाधित रुग्ण सुधाकर खाडे बेपत्ता झाले होते. त्यांच्या जावयाने रुग्णालयात संपर्क केला असता ते बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती. या घटनेने केईएम रुग्णालयात खळबळ उडाली होती.
याप्रकरणानंतर 15 दिवसांनी सुधाकर खाडे यांचा मृतदेह केईएम रुग्णालयाच्या शवागृहात सापडला होता. या संपूर्ण प्रकरणानंतर केईएम रुग्णालयाच्या प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले जात आहे.
याप्रकरणी खाडे कुटुंबियांना भाजप नेते किरीट सोमय्या यांनीदेखील मदत केली. किरीट सोमय्या यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेटही घेतली होती. यानंतर शोधाशोधनंतर खाडे यांचा मृतदेह सापडला होता.
संबंधित बातम्या :
जळगावच्या रुग्णालयातून 82 वर्षाची कोरोनाबाधित महिला बेपत्ता, आजींचा शोध सुरु
‘केईएम’मधून बेपत्ता वृद्ध कोरोनाग्रस्ताचा मृतदेह सापडला, हॉस्पिटलच्याच शवागारात 15 दिवसांनी शोध
Corona Virus : धक्कादायक! 167 कोरोना संशयित रुग्ण बेपत्ता, शोध सुरु