धक्कादायक! अमोल मिटकरी यांची गाडी फोडली, अकोल्यात प्रचंड गोंधळ

| Updated on: Jul 30, 2024 | 3:53 PM

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर काही अज्ञातांनी हल्ला केला आहे. संबंधित तरुण हे मनसे कार्यकर्ते होते, अशी माहिती समोर येत आहे. अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवरुन हा वाद झाल्याची माहिती आता समोर येत आहे.

धक्कादायक! अमोल मिटकरी यांची गाडी फोडली, अकोल्यात प्रचंड गोंधळ
Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी काही अज्ञातांकडून फोडण्यात आली आहे. अमोल मिटकरी यांच्या गाडीचे तोडफोड करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते होते, अशी माहिती समोर येत आहे. अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करताना सुपारीबाज असा उल्लेख केला होता. त्यांच्या या टीकेचा राग मनात धरुन मनसे कार्यकर्त्यांनी अकोल्यात अमोल मिटकरी यांची गाडी फोडली आहे. अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करतानाचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धरणाबाबतच्या जुन्या वक्तव्यावर राज ठाकरे यांनी टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांचा उल्लेख सुपारीबाज असा केला होता. यावरुनच मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली आहे.

अमोल मिटकरी यांनी काल वक्तव्य केलं होतं. यानंतर आज मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला. अमोल मिटकरी आज अकोल्यात विश्रामगृहात आले होते. ते आतमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत होते. ते आले तेव्हा विश्रामगृहाबाहेर मनसेचे कार्यकर्तेदेखील होते. अमोल मिटकरी विश्रामगृहात असताना बाहेर मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या कारच्या काचा फोडल्या आणि प्रचंड घोषणाबाजी केली. संबंधित प्रकार कॅमेऱ्यातही कैद झाला आहे.

अमोल मिटकरी काय म्हणाले?

मनसे कार्यकर्त्यांच्या हल्ल्यानंतर अमोल मिटकरी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी कुणाच्या धमक्यांना भीक घालत नाही, असं अमोल मिटकरी म्हणाले आहेत. गाडीच्या तोडफोड प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करणार, असंही अमोल मिटकरी म्हणाले आहेत. माझं वक्तव्य मागे घेण्याचा प्रश्नच नाही, असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर अमोल मिटकरी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. आपण कायदेशीरपणे कारवाई करु, असं अमोल मिटकरी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले आहेत.

अमोल मिटकरी यांनी नेमकी काय टीका केली होती?

“दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित दादांबद्दल सुपारी बहाद्दरांनी बोलू नये. कारण हे सुपारी बहाद्दर टोल नाका, भोंग्यांच्या आंदोलन असेल ते कोणत्याच आंदोलनात यशस्वी झालेले नाहीत. त्यांची विश्वासाहर्ता संपलेली आहे. आणि राजकारणात महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहास सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तीने अजित पवार यांच्याबद्दल प्रश्न निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे”, अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली होती.