ठाणे: वाढीव वीजबिल माफीसाठी मनसेने मुंबई-ठाण्यासह संपूर्ण राज्यात जोरदार झटका आंदोलन सुरू केलं आहे. मुंबईत मनसेने विराट मोर्चा काढला तर ठाण्यात मनसेच्या आंदोलना दरम्यान पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापट उडाली असून त्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. आंदोलकांचा मोर्चा पोलिसांनी वाटेतच अडवल्याने मनसे कार्यकर्त्यांनी प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे मनसे नेते अभिजीत पानसे, अविनाश जाधव आणि रवी मोरेंसह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (mns morcha against inflated electricity bill in maharashtra)
राज्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या वीजबिल माफीसाठीच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. ठाण्यात तर पोलिसांनी 144 कलम लागू करून जमावबंदीचे आदेश जारी केले होते. मात्र, मनसेने हे आदेश झुगारून ठाण्यात जोरदार आंदोलन केलं. जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेकडून मोठा मोर्चा काढण्यात आला. मात्र, पोलिसांनी बॅरिकेट्स लावून हा मोर्चा मध्येच अडवला. त्यामुळे संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालत बॅरिकेट्स फेकून दिल्या. ‘ठाकरे सरकार हाय हाय’, ‘मनसे जिंदाबाद’, ‘राज ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो’, अशा घोषणा देत मोर्चेकऱ्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. त्यामुळे पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालत बाचाबाची केली. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. त्यातच पोलिसांनी अभिजीत पानसे, रवी मोरे आणि अविनाश जाधव या मनसे नेत्यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे संतप्त मनसे कार्यकर्ते पोलिसांच्या व्हॅनमध्ये जाऊन बसले. त्यामुळे अधिकच गोंधळ निर्माण झाला असून पोलीस या कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न करत आहेत.
यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. भाजपने मोर्चा काढला. त्यांना परवानगी मिळते. आम्हाला परवानगी दिली जात नाही. हा कुठला न्याय? ठाकरे सरकार मनसेला घाबरत आहे का?, असा सवाल करतानाच हे सरकार उखडून फेकायचं आहे. काँग्रेसला श्रेय मिळू नये म्हणून शिवसेनेकडून वीजबिल माफीला मंजुरी दिली जात नाही, असा आरोप अविनाश जाधव यांनी केला.
मुंबईत मनसेचे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आदींच्या उपस्थितीत वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचा प्रचंड मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सरकार जर गंभीर असेल तर दखल घेईल, जर गंभीर नसेल तर मनसेच्या भाषेत इथून पुढे सरकारला उत्तर दिलं जाईल, असा इशारा मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला. यावेळी आम्ही वीजबिल भरणार नाही. कोणी वीज कापण्यासाठी आलं तर त्याच्या कानाखाली शॉक काढू, असा इशाराही देशपांडे यांनी दिला.
पोलीस आपलं काम करतात. आम्ही आमचं काम करत आहोत. आम्ही आंबेडकर गार्डन येथे जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊ. त्या ठिकाणी हाकेच्या अंतरावर मुख्यमंत्री यांचे निवासस्थान आहे. जर त्यांचं सरकार जनतेचे असेल तर ते मागणी मान्य करतील. नाही तर पुढे कसं आंदोलन करायचं याबाबतची आमची भूमिका तयार आहे, असा इशारा मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिला.
अंबरनाथमधील मनसे युनिटच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा निघत असताना शिवाजी नगर पोलिसांनी मनसेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर यांच्यासह 25 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. या सर्व कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आलं आहे. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याचा आरोप या कार्यकर्त्यांवर ठेवण्यात आला आहे.
नवी मुंबईतही कोकण भवनवर मनसेने आज मोर्चा काढला. यावेळी वीजबिल माफीचा निर्णय घेतला जात नसल्याने मनसे कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वात कोकण भवनमधील अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. तसेच राज्य सरकारने वाढीव वीजबिल माफ केले नाही तर अधिक तीव्र आंदोलन करू, असा इशाराही देण्यात आला.
पनवेलमध्ये मनसेचा जनआक्रोश मोर्चा सुरू आहे. शिवाजी चौकात हा मोर्चा आला असून मनसेचे शेकडो कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले आहेत. यावेळी ‘ऊर्जा मंत्र्यांचे करायचे काय?, खाली डोकं वर पाय’, अशा घोषणा दिल्या जात आहेत. परवानगी नाकारल्यानंतरही हा मोर्चा काढण्यात आल्याने या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. (mns morcha against inflated electricity bill in maharashtra)
पालघर आणि वसईतही मनसेने आक्रमक मोर्चा काढला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील खाणीवडे टोल नाक्यावर सर्व मनसे कार्यकर्ते जमा झाले आहेत. ‘वीजबिल माफ झालेच पाहिजे’, ‘आघाडी सरकारचा निषेध असो’, ‘राज ठाकरे यांचा विजय असो’, अशा घोषणा आंदोलकांनी दिल्याने संपूर्ण परिसर दणाणून गेला आहे. तलासरीत मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.
पुण्यातही मनसेने आक्रमक आंदोलन केलं. परवानगी नाकारल्यानंतरही मनसेने आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी मनसेचे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांना ताब्यात घेतले. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी फरासखाना पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करत सरकारचा निषेध नोंदवला. मात्र, तुम्ही कितीही धरपकड केली तरी आम्ही छुप्यापद्धतीने आंदोलन करणारचं. आंदोलन करू न देणं लोकशाहीला मारक असून यापुढे अधिक आक्रमक आंदोलन करू, असा इशारा अजय शिंदे यांनी यावेळी दिला.
मनसेच्या वीजबिल माफीच्या आंदोलनाने संपूर्ण नाशिक शहर ढवळून निघाले आहे. मनसेच्या राजगड कार्यालयावरून हा मोर्चा निघाला. गळ्यात वीजबिलांच्या माळा घालून टाळ वाजवतच मनसेचा हा मोर्चा निघाला. त्यामुळे अनेक नागरिकही या अभिनव मोर्चात सहभागी झाले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. (mns morcha against inflated electricity bill in maharashtra)
कोपरगावमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. मात्र, मोर्चा सुरू असतानाच काही कार्यकर्त्यांनी वीज वितरण कार्यालयात जाऊन जोरदार तोडफोड केली. कार्यालयाच्या काचा फोडत खुर्च्या आणि टेबलची मोडतोड केल्याने एकच तणाव निर्माण झाला. याप्रकरणी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
लॉकडाऊनच्या काळात कोरोनामुळे नागरिक आर्थिक संकटात सापडले असताना वीज वितरण कंपनीने ग्राहकांना वाढीव वीजबिल पाठविले. त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यवतमाळमध्ये आंदोलन केले. या आंदोलनात शेकडो मनसे सैनिकांनी भाग घेतला.
नांदेडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर बोंबाबोंब आंदोलन केलं. ‘कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, अशा घोषणा देत आंदोलकांनी सरकारविरोधात आरोळी ठोकली. यावेळी महिला कार्यकर्त्या मोठ्याप्रमाणावर उपस्थित होत्या.
वर्ध्यातही मनसेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर झटका मोर्चा काढला. मनसेचे वर्धा शहर जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा मध्येच अडवल्याने पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे या ठिकाणी तणाव निर्माण झाला. मात्र, पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन घेऊन जाण्यास परवानगी दिल्यानंतर या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं.
‘वाढीव वीजबिलात तात्काळ सवलत द्या’, ‘ठाकरे सरकार हाय हाय’, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो’, अशा घोषणा देत मनसेचा मोर्चा नागपूरच्या संविधान चौकात आला आहे. मनसेचे सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार असल्याने या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
MNS Protest Update | मुंबई, ठाणे, पुण्यात कार्यकर्ते आक्रमक, वाढीव वीजबिलविरोधात मनसेचा ‘झटका मोर्चा’ https://t.co/dhI8I1P30X @mnsadhikrut
#MNSAgainstInflatedBills #MNS #Mumbai #Pune— TV9 Marathi (@TV9Marathi) November 26, 2020
संबंधित बातम्या:
MNS Morcha Live : वाढीव वीजबिलाविरोधात मनसेचा ‘झटका मोर्चा’, कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की
मनसेच्या भव्य मोर्चावर ठाणे पोलिसांकडून ब्रेक, जिल्हाबंदीच्या आदेशामुळे गोंधळ
(mns morcha against inflated electricity bill in maharashtra)