Mumbai Air Quality | मुंबईत दशकातल्या सर्वात धोकादायक हवेची नोंद, कुलाबा, माझगावला सर्वाधिक फटका!

| Updated on: Jan 25, 2022 | 10:37 AM

धुळीच्या वादळांचा मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर जास्त प्रभाव झाला. मागील दशकात मुंबईतील हवा एवढी प्रदुषित कधीच नव्हती. फक्त 2012 आणि 2016 मध्ये हवेतील धोकादायक पातळी 400 च्या पुढे गेली होती.

Mumbai Air Quality | मुंबईत दशकातल्या सर्वात धोकादायक हवेची नोंद, कुलाबा, माझगावला सर्वाधिक फटका!
मुंबईत सोमवारी सर्वोच्च प्रदुषित हवेची नोंद
Follow us on

मुंबईः भारताच्या पूर्वेकडून आलेल्या धुळीच्या वादळाचे दुष्परिणाम मुंबईला भोगावे लागत आहेत. प्रदुषित हवेच्या निर्देशांकानं सोमवारी मुंबईतील अनेक उच्चांक मोडीत काढले. सोमवारी 24 जानेवारी रोजी मुंबईतील हवा ही मागील दशकातली सर्वाधिक प्रदुषित हवा असल्याची नोंद झाली आहे. मुंबईचा AQI म्हणजेच Air Quality Index 500 च्या पुढे नोंदला गेला. हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या सफर प्रणालीनुसार, येथील धोकादायक हवेचा स्तर 2.5 पीएमपर्यंत (Particulate matters) पोहोचला आहे. सोमवारी सकाळी मुंबईत चांगलेच धुळयुक्त वारे वाहत होते. मात्र संध्याकाळपर्यंत या वाऱ्याचा वेग कमी झाला. तरीही श्वसनाचे आजार असलेल्या नागरिकांनी किमान पुढील काही दिवस तरी घरी राहण्याचे आवाहन शास्त्रज्ञांकडून करण्यात आले आहे.

2.5 पार्टीक्युलेट मॅटर म्हणजे काय?

प्रदूषणामुळे हवेत धोकादायक अतिसूक्ष्म कण हवेत मिसळतात. या कणांना पार्टिक्युलेट मॅटर (पीएम 2.5) म्हणतात. या कणांचा व्यास 2.5 मायक्रॉनपेक्षा कमी असतो. हवेतील या लहान कणांमुळे वायू प्रदुषण झाल्यास दिवसादेखील दृश्यमानता कमी होते. researchmatters.in या वेबसाइटनुसार, मागील काही वर्षांमध्ये भारतात वायू प्रदुषण वाढल्यानंतर विशेषतः नागरिक 2.5 पीएम हवेच्या संपर्कात आल्यामुळे हृदयरोग व श्वसनाचे आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे मृत्यूचेही प्रमाण वाढले आहे. वायू प्रदूषणामुळे केवळ मनुष्य हानीच नाही तर पिकांवरही त्याचा परिणाम होतो.

दक्षिण मुंबईला सर्वाधिक फटका

हवेची गुणवत्ता नोंदवणाऱ्या सफर या प्रणालीनुसार, दक्षिण मुंबईला या धुळयुक्त वाऱ्यांचा जास्त फटका बसला. कुलाबा येथे 2.5 पीएमचा स्तर संध्याकाळपर्यंत धोकादायकच होता. पीएम 10 चा निर्देशांक 513 नोंदवला गेला. माझगाव येथील पीएम 2.5 चा निर्देशांक 573 पर्यंत पोहोचला. वरळीतला प्रदूषणाचा निर्देशांक 349 एवढा नोंदवला गेला. तर चेंबूर, वांद्रे-कुर्ला संकुल येथील हवेची गुणवत्ताही दुपारनंतर सुधारली. तसेच अंधेरी, भांडूप, मालाड येथील हवेची गुणवत्ताही काल संध्याकाळपर्यंत अत्यंत धोकादायक होती. मात्र संध्याकाळनंतर ही धोक्याची पातळी कमी झाली.

हवामानाचा पुढील अंदाज काय ?

हवेची गुणवत्ता नोंदवणाऱ्या सफर या संस्थेचे प्रोग्राम डायरेक्टर गुफ्रान बेग म्हणाले, मंगळवार संध्याकाळपर्यंत हवेचा दर्जा सामान्य होईल. युएईमध्ये सुरु झालेले हे धुळीचे वादळ अफगाणिस्तान, बलुचिस्तानद्वारे भारताताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचले. यामुळे मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर जास्त प्रभाव झाला. मागील दशकात मुंबईतील हवा एवढी प्रदुषित कधीच नव्हती. फक्त 2012 आणि 2016 मध्ये हवेतील धोकादायक पातळी 400 च्या पुढे गेली होती. 2015 मध्ये सरकारने प्रदुषण मोजण्यासाठीची अधिकृत उपकरणे आणली. त्यामुळे 2012 आणि 2016 मध्ये नेमकी किती धोकादायक पातळी होती, याच्या स्पष्ट नोंदी नाहीत. 2012 मध्येदेखील राजस्थानमध्ये तयार झालेल्या वादळामुळेच मुंबईतील हवा प्रदुषित झाली होती.

इतर बातम्या-

महारेशीम अभियानाचा उद्देश साध्य, आता उत्पादनवाढीसाठी विशेष प्रयत्न, शेतकऱ्यांना नेमका फायदा कसा ?

औरंगाबादच्या क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा विराजमान