मुंबईः डास हा कीटक दिसायला साधा असला तरी त्यापासून मलेरिया, डेंगी, (Dengue, Malaria) चिकनगुनिया, हत्तीरोग आदी गंभीर आजार संभवतात. त्यामुळेच त्याचा बंदोबस्त करणे आरोग्याच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे ठरते. विविध ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाकडून डास मारण्यासाठीचे वेगळे बजेट राखून ठेवलेले असते. मुंबई महापालिकेचा (BMC) विचार केला तर महापालिका डासांचा बंदोबस्त करण्यासाठी तब्बल 10 कोटी 12 लाख रुपये खर्च करते. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठीच्या कीटकनाशक विभागाकडून अळीनाशक तेलाची फवारणी करण्यात येते. यासाठी दरवर्षी तब्बल 11 लाख लीटर तेल खरेदी करण्यात येते.
डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी मुंबई महापालिका दरवर्षी 11 लाख लीटर किटकनाशक तेल खरेदी करते. यासाठी 10 कोटी 12 लाख 44 हजार रुपये खर्च येतो. पुढील तीन वर्षे हे तेल खरेदी करण्यात येणार असल्याने पुढील तीन वर्षात महापालिका यावर 30 कोटी 37 लाख 32 हजार रुपये खर्च करणार आहे.
मुंबई महापालिकेअंतर्गत कीटकनाशक हा स्वतंत्र विभाग आहे. डेंग्यू, मलेरिया यासारख्या रोगांना आळा बसावा यासाठी डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्याच्या दृष्टीने घरांची व घरांच्या जवळपासच्या परिसराची तपासणी करण्यात येते. यंदा तब्बल 40 हजारांपेक्षा जास्त ठिकाणी ‘एडिस इजिप्ती’ या डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या डासांच्या अळ्या आढळून आल्या. तर आठ हजारांपेक्षा जास्त ठिकाणी मलेरिया वाहक अळ्या आढळून आल्या. कीटकनाशक खात्यातील 1 हजार 500 कर्मचारी व अधिकारी मुंबईच्या विविध भागांची तपासणी करत असतात.
इमारत परिसरातील पाण्याच्या टाक्या, झोपडपट्ट्यांतील पाण्याचे पिप, प्लास्टिक , टायर, झाडांच्या कुंड्या, नारळाच्या करवंट्या आदी ठिकाणी साचलेले पाणी महापालिकेचे कर्मचारी फेकून देतात. त्या ठिकाणच्या पाण्याची तपासणी करण्यात येते. अशा पाणी साठलेल्या ठिकाणी अळी नाशक फवारणी करण्यात येते.
इतर बातम्या-