नागपूर : नागपूर महापालिकेचे महापौर संदीप जोशी यांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे (Mayor Sandip Joshi allegations on Tukaram Mundhe) यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मुंढे यांनी ‘स्मार्ट सिटी’मध्ये 20 कोटींचा घोटाळा केला, असा गंभीर आरोप संदीप जोशी यांनी केला आहे. याशिवाय तुकाराम मुंढे यांनी मर्जितल्या कंत्राटदारांना परस्पर कंत्राट दिला, असा आरोपदेखील त्यांनी केला आहे (Mayor Sandip Joshi allegations on Tukaram Mundhe).
“तुकाराम मुंढे यांनी इतर दोन अधिकाऱ्यांसोबत मिळून पदाचा गैरवापर केला. त्यांनी जबरदस्तीने 20 कोटी रुपये ट्रान्सफर केले”, असं संदीप जोशी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. व्यक्तिगत प्रतिमाहनन केल्याचा आरोप करत तुकाराम मुंढे यांनी सभात्याग केला होता. यानंतर संदीप जोशी यांनी तुकाराम मुंढे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.
‘आयुक्त तुकाराम मुंढे महापौरांचे फोन उचलत नाही, मेसेजला रिप्लाय देत नाही. त्यांनी मला शहाणपण शिकवू नये’, अशा शब्दात महापौर जोशी यांनी मुंढे यांच्यावर टीका केली. त्यानंतर त्यांनी तुकाराम मुंढेंवर घोटाळ्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली.
“मुंढेंनी उद्या सभागृहात यावं ही हात जोडून विनंती”
सभागृहात प्रश्न विचारणे हा सदस्यांचा अधिकार आहे. महासभेत माझी भूमिका कायद्यानुसार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांना उद्या (मंगळवार, 23 जून) होणाऱ्या महासभेत यावं, अशी हात जोडून विनंती करतो, असंही महापौर संदीप जोशी म्हणाले आहेत.
मला तुकाराम महाराजांच्या नावावर कलंक म्हणाऱ्यांना काय उत्तर देऊ? : तुकाराम मुंढे
दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत सभात्यागाचं कारण सांगत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. मला तुकाराम महाराजांच्या नावावर कलंक म्हणणाऱ्यांना काय उत्तर देऊ, असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यांनी महापौर आणि नगरसेवकांवर अधिकाऱ्याचं खच्चीकरण केल्याचा, अधिकाऱ्याला बोलू न दिल्याचा आणि व्यक्तिगत प्रतिमाहनन केल्याचाही गंभीर आरोप केला आहे.
तुकाराम मुंढे म्हणाले, “महासभा घ्यावी की नाही यावर मी एपिडिमिक अॅक्टनुसार माझं मत महापौरांना सांगितलं होतं. शासनाकडेही मी याबाबत मार्गदर्शन मागितलं होतं. त्यांनी याबाबत अटी शर्तींचा भंग होणार नाही याची काळजी घेण्यास सांगून सूचना केल्या. त्यानंतर ही सभा झाली. सभा झाली तेव्हा मी स्वतः हजर होतो. मात्र, सभा सुरु होताच मी कोणत्याही प्रश्नावर उत्तर द्यायला तयार असताना नगरसेवक आणि इतर पदाधिकारी मी बोलत असतानाच उभे राहून अडथळा करत होते. कोणताही प्रश्न विचारायचा आणि उत्तर देण्यास सुरुवात केली की अर्ध्यावर थांबवायचं. अधिकाऱ्यांना बोलून द्यायचं नाही. त्यानंतर अर्धवट वाक्यांचा विपर्यास करुन त्याला चुकीच्या पद्धतीने सादर करायचं. सदस्यांना पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन काढण्याचा अधिकार आहे, मात्र, तो उत्तर पूर्ण देऊन झाल्यावर आहे. मात्र, उत्तर देत असतानाच अधिकाऱ्यावर मोठ्या आवाजात ओरडणं, अधिकाऱ्याच्या दिशेने अंगुलीनिर्देश करुन त्याला गप्प बसवण्याचा प्रयत्न करणं हे निंदनीय आहे.”
“हे होत असल्याने अधिकाऱ्यांचं मनोधैर्य खच्चीकरण होतं. त्यामुळे हा अधिकाऱ्यांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहे. मी हे महापौरांच्या लक्षात आणून दिलं. तसेच हे परत झालं तर सभागृहात थांबणार नाही हे सांगितलं. यानंतरही हा प्रकार घडला. एका नगरसेवकाने तुम्ही ब्रिटिशांपेक्षाही वाईट आहात. इंग्रज तुमच्यापेक्षा बरे होते, असं विधान सातत्याने करत होते. असं होत असतानाही महापौरांनी संबंधित नगरसेवकांना कोणतीही सूचना दिली नाही. त्यांना थांबण्यास सांगितलं नाही. अशाप्रकारची शेरेबाजी करु नका असंही सांगितलं नाही. अशाप्रकारे व्यक्तिगत शेरेबाजी करण्याचा अधिकार ना अधिकाऱ्यांना आहे, ना पदाधिकाऱ्यांना. सभागृहाची शिस्त कायम ठेवणं महापौरांची जबाबदारी असताना त्यांनी तसं केलं नाही. त्यामुळे यानंतर सदस्यांनी तुम्ही तुकाराम महाराजांवर कलंक आहात हा शब्दप्रयोग केला. त्यावेळी मी उठलो आणि महापौरांना हे व्यक्तिगत प्रतिमाहनन असल्याचं सांगितलं. तसेच सभात्याग करत असल्याचं स्पष्ट केलं,” असंही तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं.
“महौपारांचं दुटप्पीपणाचं धोरण चुकीचं”
तुकाराम मुंढे म्हणाले, “महापौरांनी मला पत्र पाठवत सभात्याग करणं हा सभागृहाच्या इतिहासातील कलंक असल्याचं सांगितलं. महापौरांनी मला तुकाराम महाराजांच्या नावावर कलंक आहे असं म्हणणाऱ्यांना बोलण्याऐवजी मलाच कलंक असल्याचं सांगितलं. याचाच अर्थ हे परस्पर संमतीने सुरु आहे. महापौरांचं काम समन्यायाने कुणावर अन्याय न होता सभागृह चालवणं आहे. पण त्यांनी त्याऐवजी दुजाभाव केला आणि बाहेर अर्धवट माहिती दिली. एकिकडे महापौरांनी सभागृहात अधिकार असताना चारित्र्यहनन होऊ दिलं आणि वर मलाच कलंक असल्याचं म्हटलं. हे महौपारांचं दुटप्पीपणाचं धोरण चुकीचं आहे. म्हणूनच मी सभागृहाबाहेर निघून आलो.”
“जसं महापौर ही व्यक्ती नसून संस्था आहे, तसंच आयुक्त ही देखील व्यक्ती नसून संस्था आहे. जर सभागृहात आयुक्तांनाच बोलू दिलं जात नसेल तर इतर अधिकाऱ्यांची काय अवस्था होत असेल याचा विचार करता येईल. महापौरांनी सभागृहात चुकीच्या गोष्टींवर आक्षेप घ्यायचा नाही आणि नंतर विनंतीच्या स्वरुपात बोलायचं याचा अर्थ समजून घेता येईल,” असंही ते म्हणाले.
“व्यवस्थात्मक प्रश्न त्याच मार्गाने साडवावे लागतील, एकटा तुकाराम मुंढे काहीही करु शकत नाही”
तुकाराम मुंढे म्हणाले, “मागील तीन महिन्यापासून आपण कोरोना नियंत्रणासाठी काम करत आहोत. आम्ही त्या कामात व्यग्र आहोत. त्यावरच आमचं लक्ष केंद्रित आहे. असं असताना पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवरही कामं केलं. त्यामुळे यंत्रणा तणावत आहे. असं असताना यंत्रणांना समजून घेणं आवश्यक आहे. वर्षानुवर्षांचे प्रश्न 2-3 महिन्यात संपणार नाही. काही व्यवस्थात्मक प्रश्न असतील तर त्याला त्याच मार्गाने साडवावे लागतील. एकटा तुकाराम मुंढे काहीही करु शकत नाही. उन्हाळ्यात आम्ही पाण्याची कमतरता येऊ दिली नाही. अनेक कामं केली तरी यंत्रणांना दोष देण्यात येत आहे.”
संबंधित बातमी : तुकाराम मुंढेंनी मला शहाणपण शिकवू नये, महापौरांचं आयुक्तांना उत्तर