नागपूर : “30 लाख नागपूरकरांची काळजी (Tukaram Mundhe advice to Health Workers) तुम्हाला घ्यायची आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:चीही काळजी घ्या”, असा प्रेमळ सल्ला नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिला. नागपुरात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची तुकाराम मुंढे यांनी भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढविले. यावेळी कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला (Tukaram Mundhe advice to Health Workers).
आरोग्य कर्मचारी सर्वेक्षणाला निघत असताना तुकाराम मुंढे आयसोलेशन हॉस्पीटलमध्ये पोहोचले आणि त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. तुकाराम मुंढेंना अचानक समोर बघून सारेच कर्मचारी अवाक झाले. विशेष म्हणजे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वत: त्यांच्या बसमध्ये चढून सर्व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या कामाचे कौतुक करीत सर्वांशी हितगूज साधलं.
“आपल्याला आपला जीव धोक्यात घालून काम करावं लागत आहे. त्यामुळे आपणच आपली काळजी घ्यायला हवी. एका सीटवर एकाच महिलेने बसावं आणि सर्व निर्देशाचं पालन करावं. नागपूरकरांची आशा तुमच्यावर आहे. आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन कोरोनाच्या संकटातून बाहेर पडायचं आहे”, असं कर्मचाऱ्यांशी बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले.
यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील इतर भागांचाही दौरा केला. यात त्यांना जिथे लोकं एकत्र गर्दी करुन दिसली तिथे गाडीतून उतरुन त्यांना ‘सोशल डिस्टंसिंग’चे धडे दिले. ‘कोरोना’ला हरविण्यासाठी, साखळी तोडण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगत लॉकडाऊनदरम्यान घराच्या बाहेर पडू नका, असं आवाहन त्यांनी केलं.
तुकाराम मुंढे यांनी आज सकाळीच शहर पालथे घातलं. मानेवाडा परिसरात एका रेशन दुकानासमोर धान्य घेण्यासाठी गर्दी असल्याचं दिसलं. तिथे सामाजिक अंतराचे पालन करण्यात येत नसल्याचे लक्षात येताच ते स्वत: पोहोचले. सर्वांना तीन-तीन फुटाच्या अंतरावर उभं करुन सामाजिक अंतराचं पालन करण्यासंदर्भात मार्गदर्शन केलं. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन केलं. यावेळी त्यांनी राशन दुकानदाराला तातडीने दुकानासमोर तीन-तीन फुटावर खुणा करण्यास सांगितलं.
अनेकांना आश्चर्याचा धक्का
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ‘लॉकडाऊन’ची अंमलबजावणी व्हावी यासाठी मनपा आयुक्त मुंढे स्वत: शहरात फिरत असल्याचे बघून सर्वांनाच आश्चर्य वाटले. गर्दी असलेल्या ठिकाणी गाडी थांबल्याचे बघताच आणि त्यातून येणारा व्यक्ती दुकानाकडे येत असल्याचं बघून अनेकांना सुरुवातीला काही कळलंच नाही. मात्र, दुकानात पोहोचल्यावर ते मनपा आयुक्त तुकाराम मुंढे असल्याचं लक्षात येताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
संबंधित बातमी :