मुंबई : जमावाकडून होणाऱ्या हिंसाचारावर ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी चिंता व्यक्त केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या जीवापेक्षा गायीच्या हत्येला जास्त महत्त्व दिलं जातंय, असं ते म्हणाले. शिवाय आजच्या या समाजाता माझ्या मुलांचीही चिंता वाटते, असं त्यांनी सांगितलं.
समाजात विष पसरलंय. माझ्या मुलाच्या सुरक्षेची चिंता वाटते. कायदा हातात घेण्याची खुली सूट मिळाली आहे. मला धर्माचं शिक्षण मिळालं होतं. पण तिला (पत्नी) धर्माचं शिक्षण मिळालेलं नाही. कारण, ती लिबरल कुटुंबातून आहे. मी माझ्या मुलांना धर्माविषयी शिकवलं नाही. चांगलं आणि वाईट याचा धर्माशी संबंध नाही. पण मुलांची चिंता वाटते, की त्यांना कधी जमावाने घेरलं आणि विचारलं की तुम्ही हिंदू आहात की मुस्लीम? तर त्यांच्याकडे काहीही उत्तर नसेल, असं नसीरुद्दीन शाह म्हणाले. वाचा – ‘विराट हा उद्धट खेळाडू’ – नसरुद्दीन शाह
परिस्थिती लवकर सुधारणार नसल्याचं पाहून आणखी चिंता वाटते, असं नसीरुद्दीन शाह म्हणाले. या गोष्टींची भीती वाटत नाही, तर चिड येते. हा राग प्रत्येक चांगला विचार करणाऱ्या व्यक्तीला यायला हवा. हे आपलं घर आहे, इथून कोण आपल्याला हाकलू शकतो?, असा सवालही शाह यांनी केला.
उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये 3 डिसेंबरमध्ये गोहत्येच्या अफवेवरुन हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात पोलीस अधिकाऱ्याचाही गोळी लागून मृत्यू झाला. या पोलीस अधिकाऱ्याच्या मृत्यूवर बोलताना शाह यांनी त्यांची सद्यपरिस्थितीबाबतची चिंता व्यक्त केली आणि कायदा हातात घेण्याची सूट मिळाली असल्याचं सांगितलं.