मुंबई | 14 फेब्रुवारी 2024 : भाजप, शिवसेना शिंदे गट पाठोपाठ आता महायुतीच्या तिसऱ्या प्रमुख पक्षाकडूनही राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी पुन्हा उमेदवारी मिळणार आहे. येत्या मार्चला त्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार होता. त्यामुळे अजित पवार गटाकडून कुणाला संधी दिली जाणार? याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात होते. भाजपकडून तीनही जागांवर नव्या नेत्यांना संधी देण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाकडूनही नव्या नेत्याला संधी देण्यात आली आहे. तर अजित पवार गटाने प्रफुल्ल पटेल यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत त्यांना राज्यसभेची संधी दिली आहे.
महायुतीकडून आतापर्यंत राज्यसभेच्या 6 पैकी 5 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. सहाव्या जागेबाबतचा सस्पेन्स कायम आहे. सहाव्या जागेवर निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे संकेत महायुतीच्या नेत्यांनी आधीच दिले आहेत. त्यामुळे महायुतीने सहाव्या जागेसाठी खरंच उमेदवार दिला तर लढत चुरशीची होईल. राष्ट्रवादीकडून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. तसेच बाबा सिद्दीकी यांच्या देखील नावाची चर्चा होती. पण प्रफुल्ल पटेल यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे.
महायुतीच्या तीनही पक्षांकडून आज राज्यसभेच्या उमेदवारांसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपने तीन उमेदवार जाहीर केले आहेत. भाजप नेत्या मेधा कुलकर्णी, काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेले अशोक चव्हाण, भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते अजित गोपछडे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांनी नावे चर्चेत होती. यामध्ये विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर यांची नावे चर्चेत होती. पण भाजपकडून मेधा कुलकर्णी यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न झाले आहेत.
भाजपकडून मेधा कुलकर्णी यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलं आहे. तर भाजप पक्षात अनेक वर्ष काम करणारे अजित गोपछडे यांना राज्यसभेची संधी देण्यात आली आहे. अजित गोपछडे हे पेशाने डॉक्टर आहेत. तसेच काँग्रेसमध्ये महत्त्वाचे मानले जाणारे नेते अशोक चव्हाण यांना भाजप प्रवेशानंतर राज्यसभेची उमेदवारी मिळाली आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना संधी देण्यात आली आहे. तर अजित पवार गटाकडून पुन्हा प्रफुल्ल पटेल यांना संधी देण्यात आली आहे.