सातारा: महाराष्ट्राच्या जडणघडणीत शरद पवार यांचा मोलाचा वाटा आहे. मात्र, मराठा आरक्षणाविषयी ते सध्या काहीच बोलत नाहीत, असे वक्तव्य मराठा आरक्षण संघर्ष समितीचे नेते सुरेश पाटील यांनी केले. शरद पवार यांनी मराठा आरक्षणाविषयीची आपली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे. जेणेकरुन मराठा समाजाला आंदोलनाची पुढची दिशा निश्चित करता येईल, असे सुरेश पाटील यांनी सांगितले. (Sharad Pawar should clear his stand on Maratha reservation demand by Maratha reservation comittee)
मराठा आरक्षण संघर्ष समिती आणि मराठा आरक्षण समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 2 नोव्हेंबरला सातारा येथे गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत मराठा आरक्षणाची पुढची दिशा काय असावी, याबाबत खल होईल. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी विनंती सुरेश पाटील यांनी केली. त्यामुळे आता शरद पवार मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सविस्तर भाष्य करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 9 सप्टेंबरला झालेल्या सुनावणीवेळी राज्यातील मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली होती. तेव्हा शरद पवार यांनी सरकारने अध्यादेश काढून मराठा समाजाला दिलासा द्यावा, असा पर्याय सुचवला होता. मात्र, तेव्हापासून मराठा आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तातडीने घटनापीठ स्थापन करावे, असा अर्ज बुधवारी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात केला आहे. तसेच मराठा आरक्षणाची स्थगिती उठवण्यासंदर्भातही सुनावणी व्हावी, अशी मागणी राज्य सरकारने केली आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकलली गेल्याने राज्यातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या आजच्या नाशिक दौऱ्यावेळी पोलिसांकडून विशेष काळजी घेण्यात आली होती. या आंदोलकांकडून शरद पवार यांच्या दौऱ्यात व्यत्यय आणला जाण्याची शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी मराठा आंदोलकांना नोटीसा बजावत त्यांच्यावर पाळत ठेवली होती.
संबंधित बातम्या:
‘मराठा आरक्षणासाठी तातडीने घटनात्मक खंडपीठ नेमा’, राज्य सरकारची मुख्य न्यायमूर्तींकडे मागणी
मराठा आरक्षणाच्या निर्णयासाठी आम्ही का थांबावं? राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा सरकारला सवाल
तामिळनाडूला जमलं ते आपल्याला का जमत नाही?; मराठा आरक्षणावरून चंद्रकांत पाटलांचा सरकारला सवाल
Maratha Reservation LIVE | मराठा आरक्षण सुनावणी 4 आठवडे पुढे ढकलली
(Sharad Pawar should clear his stand on Maratha reservation demand by Maratha reservation comittee)