महाविकास आघाडीत सारं काही आलबेल आहे, असं चित्र दिसत नाहीय. कारण महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्ये सध्या टोकाचा वाद बघायला मिळतोय. विदर्भातील जागांवरुन काँग्रेस आणि ठाकरे गटात तणाव निर्माण झाला आहे. निवडणूक तोंडावर आहे. असं असताना जागावाटपावरुन सुरु असलेली महाविकास आघाडीतील रस्सीखेच आता कुठपर्यंत जाणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. मविआत एकीकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याबाबत एकमत नाही. आता दुसरीकडे जागावाटपाचा तिढा देखील सुटत नाहीय. हा तिढा लवकर सुटला नाही तर प्रचाराला वेळ मिळणार नाही. त्यामुळे हा तिढा लवकर सुटणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार या वादावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार काँग्रेसच्या दिल्लीतील ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार आज पुन्हा काँग्रेस हायकमांडसोबत फोनवर संवाध साधणार आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी या वादावर बोलण्यास नकार दिला होता. दरम्यान, काँग्रेसचे राज्यातील महत्त्वाचे नेते दिल्लीला गेले आहेत. त्यांची दिल्लीतील हायकमांडसोबत चर्चा सुरु आहे. दुसरीकडे मुंबईतही ठाकरे गटाने तातडीची बैठक बोलावली आहे. या घडामोडींदरम्यान शरद पवार या वादात मध्यस्थी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शरद पवार यांनी याआधीदेखील महाविकास आघाडीत झालेल्या वादावर मध्यस्थी केली आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटपासाठी अनेक बैठका पार पडल्या. या बैठकांमध्ये प्रचंड वादविवाद देखील झाला. मविआची कालदेखील बैठक पार पडली. मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये जवळपास 10 तास बैठक चालली. पण तरीही तोडगा निघाला नाही. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील प्रमुख घटकपक्ष हे एकमेकांच्या विरोधात टोकाची भूमिका घेतात की सामंजस्याने विषय सोडवतात? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
ठाकरे गटाला विदर्भात 12 जागा हव्या आहेत. ठाकरे गटाने त्या जागांवर दावा केला आहे. त्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. ठाकरेंनी मागितलेल्या बहुतांश जागा या भाजपकडे आहेत. पण त्याच 12 पैकी बहुतांश जागा या काँग्रेसला हव्या आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसच्या धानोरकरांची जागाही ठाकरे गटाला हवी आहेत. लोकसभेला आम्ही रामटेक, अमरावती, कोल्हापूर अशा 3 जागा सोडल्या होत्या. आता काँग्रेसने आम्हाला विदर्भात काही जागा सोडाव्यात, अशी ठाकरे गटाची मागणी आहे.