नागपूर : नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात नुकताच भुसुरुंग स्फोट केला. यात ‘सी-60’ पथकाचे 15 जवान शहीद झाले. आता नक्षलवाद्यांनी आपल्या हिंसक कारवायांना गती देण्यासाठी आणि सुरक्षित ठिकाण म्हणून नवीन झोन स्थापन केला आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र या तीन राज्यात नक्षलवाद्यांनी नवीन झोन स्थापन केला आहे. हे तिन्ही राज्य घनदाट जंगलांनी जोडलेले आहेत. याच जंगलात नक्षलवाद्यांचा नवा अड्डा आहे.
महाराष्ट्रातील गडचिरोली-गोंदिया, छत्तीसगड आणि मध्यप्रदेशात घनदाट जंगलाने व्यापलेला हा आहे नक्षलवाद्यांचा नवीन अड्डा. आतापर्यंत दंडकारण्य हा नक्षलवाद्यांचा मुख्य अड्डा होता. याच दंडकारण्यातून शेजारच्या राज्यात नक्षलवादी हिंसक कारवाया करतात. पण छत्तीसगड आणि महाराष्ट्र पोलीसांनीही दंडकारण्याच्या भागात पोलीस कारवायांचा वेग वाढवला. त्यामुळेच नक्षलवाद्यांनी आता नवा अड्डा शोधला आहे. महाराष्ट्र, छत्तीसड आणि मध्य प्रदेश, या तीन राज्यातील जंगली भागात नक्षलवाद्यांनी नविन झोनची स्थापना केली आहे.
नक्षलवाद्यांच्या नव्या झोनला नक्षल चळवळीच्या केंद्रीय समितीनंही मान्यता दिलीय. या नव्या झोनची जबाबदारी संह्यांद्री म्हणजे मिलिंद तेलतुंबडे, भूपती यांच्यावर सोपवण्यात आली आहे. नव्या झोनमध्ये नक्षल चळवळ विस्तार करण्यासाठी जंगली भागातील तरुणांच्या भरतीचा नक्षलवाद्यांचा प्लान आहे. तर चळवळीत तरुणींच्या भरतीची जबाबदारी गडचिरोली-गोंदियाची जबाबदारी असलेल्या आणि केंद्रीय समितीच्या सदस्य राधाक्कावर सोपवण्यात आलीय. काही दिवसांपूर्वी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना माजी नक्षल कमांडर पहाडसिंग यांनीही याची कबुली दिली होती.
गेली 35 वर्षे दंडकारण्यात नक्षलवाद्यांनी आपला अड्डा केला होता. पण आता नक्षल कारवाया पुढे नेण्यासाठी नक्षलवाद्यांनी नविन झोनची स्थापना केलीय. त्यामुळे आता महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या या नव्या झोनमध्ये नक्षल कारवाया थांबवण्याचं मोठं आव्हान तीन्ही राज्याच्या पोलीसांसमोर आहे.