मुंबई : “महाराष्ट्रात आजपर्यंत कोरोनाचे 10 पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत (CM Uddhav Thackeray on Corona). परंतु, या 10 रुग्णांमध्ये कोरोनाचे लक्षणे दिसत नाहीत. कोरोनामुळे घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. मात्र, दक्षता घ्यावी. गर्दी टाळली गेलीच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत गर्दी होता कामा नये. पुढचे 15 ते 20 दिवस आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले (CM Uddhav Thackeray on Corona). कोरोनाबाबत राज्यातील जनतेला अधिकृत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलवण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
“संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसची दहशत आहे. त्याची वाढ झपाट्याने होत आहे. आपणसुद्धा सावधपणे याची काळजी घेत आहोत. कोरोना बाधित रुग्ण सापडल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे याबाबत अधिकृत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली आहे”, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
“आजपर्यंत आपल्या राज्यात एकूण 10 पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत. परंतु, या 10 रुग्णांमध्ये कोरोनाचे लक्षणे दिसत नाहीत. कोरोना पॉझिटीव्ह आला म्हणून घाबरुन जाण्याचं कारण नाही. सुदैवाने आपल्याकडे जेवढे रुग्ण बाधित आढळले आहेत त्यांच्यात गंभीर अशी लक्षणं आढळलेली नाहीत. 1 तारखेला जो ग्रुप परदेशातून भारतात आला त्या ग्रुपशी संपर्कात आणि संबंधित असलेल्या व्यक्तींना ही बाधा झाली आहे. या सर्वांशी आपण संपर्क साधला आहे. त्याचबरोबर त्यांच्या संपर्कात आलेल्यांना आपण संपर्क केलेला आहे”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
“पुण्यामध्ये आतापर्यंत जवळपास 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. परंतु, काही जणांमध्ये त्याची लक्षणेही दिसत नाही, इतका सौम्य तो आहे. महाराष्ट्र सरकार आणि प्रशासन याकडे पूर्णपणे लक्ष्य ठेवून आहे. नागरिकांना आम्ही आवाहन करतोय की, घाबरुन जाण्यासारखं कारण नाही. मात्र, दक्षता घेणं जरुरीचं आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“मुंबईमध्येही याच ग्रुपशी संबंधित असणाऱ्या दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये वेगळ्या कक्षात ठेवलेलं आहे. सर्वोतपरीने आम्ही काळजी घेत आहोत. परदेशातून येणाऱ्यांनाही किमान 14 दिवस गर्दीत जाऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे”, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्याबरोबर आम्ही बैठक घेतली. याशिवाय आज मुंबईत तज्ज्ञ व्यक्तींसोबत बैठक झाली. त्यावेळी शाळा कॉलेजना सुट्टी द्यावी का? यावर चर्चा झाली. मात्र, सध्यातरी तशी परिस्थिती नाही. त्यामुळे राज्यातील शाळा-कॉलेजांना आपण सुट्टी दिलेली नाही. आम्ही दर दोन तासांनी त्याचा आढावा घेत आहोत. जर परिस्थिती तशी असेल तर तोही निर्णय आम्ही घेऊ. पण आजतरी घाबरुन जावून असा काही निर्णय घेण्याची आवश्यकता नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“अधिवेशनाबाबत प्रश्न विचारला जात आहे. लोकप्रतिनिधींनी आपआपल्या मतदारसंघात जाण्याची गरज आहे. याशिवय जे प्रशासन इथे आहे तेदेखील आपापल्या जागी जाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आम्ही दोन्ही विरोधी पक्षनेत्यांना बोलवलं होतं. अध्यक्ष, सभापती महोदय, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री आणि आणखी सहकारी मंत्री होते. कामकाज अर्धवट ठेवून अधिवेशन संपवण्याचं नाही. कामकाज पूर्ण करुन शनिवारी अधिवेशन संपवायचं, जेणेकरुन सर्व लोकप्रतिनिधी आपापल्या मतदारसंघात जातील आणि कर्तव्य पार पाडतील”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
“रेल्वे स्टेशन किंवा इतर ठिकाणी तपासणी कतरण्याची सध्या तरी आवश्यकता नाही. कारण हा आजार परदेशातून आला आहे”, असंदेखील उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
“आयपीएलच्या बाबत एक सूचना आलेली आहे की, प्रेक्षकांशिवाय आयपीएल मॅच करु शकत नाही. मात्र, त्यांची अधिकृत अशी कोणतीही माहिती सरकारकडे आलेली नाही. गर्दी टाळली गेलीच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत गर्दी होता कामा नये. पुढचे 15 ते 20 दिवस आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
संबंधित बातम्या :
खोकायचं कसं, शिंकायचं कसं? हात स्वच्छ धुणे म्हणजे नेमकं काय? पुणे विभागीय आयुक्तांच्या सोप्या टिप्स