मुंबई : ‘चला हवा येऊ द्या’ मालिकेचे सूत्रसंचालक आणि दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे यांनी चला ‘हवा येऊ द्या’मध्ये वापरलेल्या वादग्रस्त फोटोबद्दल जाहीर माफी मागितली आहे (Nilesh Sabale Apologize for controversial Photo). राज्यसभा खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी निलेश साबळे यांच्यावर राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीचा वापर केल्याचा आरोप केला होता. तसेच याबद्दल जाहीर माफी मागण्यास सांगितलं होतं. यानंतर त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत दिलगिरी व्यक्त केली.
निलेश साबळे म्हणाले, “कालपासून एक फोटो फिरतो आहे. तो चला हवा येऊ द्यामध्ये दाखवलेला असल्यानं बरेचसे गैरसमज निर्माण झाले आहेत. खरंतर ते स्किट आणि प्रहसन वेगळं होतं. त्यामध्ये तो फोटो वेगळ्या कारणाने, वेगळ्या अर्थाने वापरला होता. त्यामध्ये कोणत्याही महापुरुषांचा, महान पुरुषांचा अपमान करण्याचा आमचा उद्देश नव्हता. तो पूर्वीही नव्हता, यापुढेही कधीच नसेल. पण त्यामुळे थोडासा वाद निर्माण झाला. गैरसमज निर्माण झाले. त्यामुळेच मी तुमच्यासमोर आलो आहे.”
“खरंतर छत्रपती शाहू महाराज किंवा या देशातील सर्वच महान व्यक्ती यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. त्यामध्ये वापरलेला फोटो शाहू महाराजांचा नव्हता. पण ज्याही राजांचा होता त्यांच्याबद्दलही आम्ही दिलगीरी व्यक्त करतो. सर्वच महापुरुषांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. अगदीच तांत्रिक गोष्टीतून झालेली ती चूक होती. त्यामुळे याबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करतो, मी माफी मागतो. क्षमस्व”
दरम्यान, संभाजीराजेंनी ‘चला हवा..’मध्ये राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीचा वापर केल्याचा आरोप करत आक्रमक पवित्रा घेतला होता. ते म्हणाले होते, ‘लोकप्रियतेची हवा डोक्यात घुसली, की माणूस विक्षिप्त वागायला सुरू करतो. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीच्या पद्धतीने वापर केला गेला आहे. हे आक्षेपार्ह तर आहेच, परंतु निषेधार्ह सुद्धा आहे.’
‘निलेश साबळे तसेच झी वाहिनीने गैरकृत्याची जबाबदारी घेऊन जाहीर माफी मागावी. अन्यथा वाहिनी आणि दिग्दर्शक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,’ असा इशाराही छत्रपती संभाजीराजे यांनी दिला होता. ‘आमचे घराणे कलेचे आश्रयदाते आहे. स्वतः शाहू महाराजांनी कोल्हापूरला कलानगरीमध्ये रुपांतरित केलं. सयाजीराव गायकवाडांचे योगदानही कमी नाही. कलेसाठी स्वातंत्र्याची आणि पोषक वातावरणाची गरज असते. याचा अर्थ असा नाही, की काहीही करावं. आम्हा सर्व इतिहासप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत,’ अशी खंतही संभाजीराजेंनी व्यक्त केली.
संबंधित बातम्या:
निलेश साबळेंच्या डोक्यात लोकप्रियतेची हवा, खासदार संभाजीराजेंकडून माफीची मागणी
Nilesh Sabale Apologize for controversial Photo