नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर (Nirmala Sitharaman on Congress) 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. त्यांच्या या पॅकेजची सविस्तर माहिती देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज (17 मे) सलग पाचव्या दिवशी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना स्थलांतरित मजूर आणि काँग्रेसकडून केली जाणारी टीका यासंदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना निर्मला सीतारमन भडकल्या आणि त्यांनी काँग्रेसला काही सूचना दिल्या (Nirmala Sitharaman on Congress) .
“स्थलांतरित मजूर हवालदिल होऊन रस्त्यावर पायी जात असतील तेव्हा त्यांच्या मदतीला धावून जा. त्यांना आपल्या गावी सोडण्यासाठी केंद्राकडून ट्रेन मागवा. तुम्ही सांगाला तिथे तीन तासांत रेल्वे दाखल होईल. त्यांच्याजवळ बसून त्यांच्याशी बातचीत करुन त्यांचा प्रश्न सूटणार नाही. अन्यथा काँग्रेसच्या नेत्यांनी रस्त्यावर चालणाऱ्या मजुरांसोबत चालत जावं, त्यांच्या लहान मुलांना किंवा त्यांची सूटकेस पकडावी. हे मला अत्यंत दु:खी होऊन व्यक्त करावं लागत आहे”, असा घणाघात निर्मला सीतारमन यांनी केला.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रस्त्यावर पायी चालणाऱ्या मजुरांसोबत बतचीत केल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. याच गोष्टीचा धागा पकडत सीतारमन यांनी राहुल गांधीवर नाव न घेता निशाणा साधला. “स्थलांतरितांसाठी ट्रेन मागवा, असं काँग्रेस पक्ष त्यांच्या राज्य सरकारांना का बोलू शकली नाही? स्थलांतरित मजुरांचा रस्ता अडवून त्यांच्याशी बातचीत करुन राजकारण करायची ही वेळ आहे का? मग ड्रामेबाज कोण आहे?”, असा सवाल सीतारमन यांनी उपस्थित केला.
“मी विरोधी पक्षांना हात जोडून विनंती करते की, स्थालांतरितांसाठी एकत्र येऊन काम करायला हवं. विरोधी पक्ष अशी टीका करत आहेत की जसं त्यांची सत्ता असलेल्याराज्यात स्थलांतरितांचे सर्व प्रश्न सूटले आहेत. मी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना विनंती करते. जबाबदारीची जाणीव ठेवा”, असं निर्मला सीतारमन म्हणाल्या.
“ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता आहे किंवा त्यांच्या मित्रपक्षाची सत्ता आहे तिथे त्यांनी स्थलांतरित मजुरांसाठी ट्रेन मागवावी. केंद्र सरकारकडून ट्रेनमार्फत त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यात येईल. काँग्रेसने ट्रेन मागवून स्थलांतरित मजुरांची ट्रेनने रवानगी करावी”, असं निर्मला सीतारमन म्हणाल्या.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन घोषित करताना पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की, तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा, तुमच्या जेवणाची आणि राहण्याची सर्व सुविधा केली जाईल. पंतप्रधानांनी सांगितल्यानुसार आम्ही प्रामाणिकपणे शक्य होईल तितकं त्यांना सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न केला”, असं सीतारमन यांनी सांगितलं.
“स्थलांतरित मजुरांच्या अन्न आणि निवाऱ्याची संपूर्ण योजना केली गेली होती. यामध्ये गुरुद्वारे, सामाजिक संस्थादेखील सरकारला सहकार्य करत सहभागी झाले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्री यांच्यात बैठक पार पडल्यानंतर मजुरांना आपापल्या घरी सोडण्याबाबत चर्चा झाली. त्यानंतर सर्व स्थलांतरित मजुरांना आपापल्या घरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला”, असं सीतारमन म्हणाल्या.
“केंद्र आणि राज्यांच्या चर्चेनंतर स्थलांतरित मजुरांना आपापल्या राज्यात घेऊन जाण्यासाठी केंद्र सरकारकडून ट्रेन पाठवण्यात आल्या. राज्य चांगल्याप्रकारे सहकार्य करत आहेत. स्थलांतरितांना नियोजनबद्ध पद्धतीने त्यांच्या राज्यात ट्रेनमार्फत सोडण्यात येत आहे. यापुढेही सोडण्यात येईल. जवळपास 1500 ट्रेन तयार आहेत. तुम्ही फक्त जागा सांगा. तिथे ट्रेन तीन तासांच्या आत पाठवल्या जातील”, असं निर्मला सीतारमन यांनी सांगितलं.
“केंद्र सरकार स्थलांतरित मजुरांना ट्रेनमार्फत घरी सोडत आहे. याशिवाय ट्रेनमध्ये मजुरांच्या मोफत जेवणाचीदेखील व्यवस्था करण्यात आली. मात्र, तरीदेखील रस्त्यावर स्थलांतरित मजुरांच्या पायी रांगा दिसत आहेत. हे बघून अत्यंत वाईट वाटतं”, असं निर्मला सीतारमन म्हणाल्या.