जनसंघाला ब्राह्मणांचा पक्ष म्हणून हिणवलं गेलं, दगड मारले गेले : नितीन गडकरी

| Updated on: Feb 23, 2020 | 8:48 PM

"जनसंघाच्या काळात पक्षाला ब्राह्मणांचा पक्ष म्हणून हिणवलं गेलं. जनसंघाच्या नेत्यांना दगड मारले गेले, असा तो कठीण काळ होता", असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) म्हणाले.

जनसंघाला ब्राह्मणांचा पक्ष म्हणून हिणवलं गेलं, दगड मारले गेले : नितीन गडकरी
Follow us on

नागपूर : “जनसंघाच्या काळात पक्षाला ब्राह्मणांचा पक्ष म्हणून हिणवलं गेलं. जनसंघाच्या नेत्यांना दगड मारले गेले, असा तो कठीण काळ होता”, असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) म्हणाले. भाजप पक्षाचं पूर्वी जनसंघ असं नाव होतं. जनसंघच्या म्हणजेच भाजप नेत्या सुमातीबाई सुकलीकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यक्रमात उपस्थित भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना अनेक सूचना दिल्या.

“जनसंघाने त्याकाळात मोठी आंदोलनं केली, संघर्ष केला. मात्र, तरीही पक्षाला यश मिळालं नाही. यामागे कारण आहे. त्याकाळी जनसंघ हा उच्च वर्णीयांचा पक्ष, राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा खून करणाऱ्यांचा पक्ष, असं समजलं जायचं. त्यामुळे यश मिळत नव्हतं आणि निवडणुकीत निवडून येणं कठीण होतं”, असं गडकरींनी (Minister Nitin Gadkari) सांगितलं.

“आपल्या विचारसरणीबाबत अजूनही अनेकांच्या मनात गैरसमज आहे. हा गैरसमज दूर करायला हवा. त्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. आमदार, खासदार झाल्यावर साधारणत: अनेकांमध्ये मोठेपण येतं. मात्र, अशाप्रकारचं मोठेपण न येऊ देता कार्यकर्त्यांसोबत राहून पक्षाचं काम करायला हवं”, असं नितीन गडकरी म्हणाले.

“देशातील वातावरण भीती या शब्दाभोवती फिरत आहे. सीएएबाबत जनतेच्या मनात गैरसमज आहे. ते दूर व्हायला पाहिजेत. सर्वसामान्यांच्या मनात भ्रम निर्माण केला जातोय. कारण त्यामागे मतांचं राजकारण आहे. जनतेच्या मनातून ही भीती आपल्याला काढायला हवी. त्यासाठी आपल्याला मोठं काम करायचं आहे”, अशा सूचना नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.