मुंबई: राज्यातील ठाकरे सरकारने अनलॉकची नवी नियमावली जाहीर केली आहे. नव्या नियमावलीत अनेक गोष्टींना शिथिलता देण्यात आली आहे. अगदी उद्यापासून मेट्रो रेल्वेही सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. मात्र, धार्मिकस्थळं सुरू करण्यास अद्यापही परवानगी देण्यात आली नाही. धार्मिकस्थळं सुरू करण्यासाठी भाजपसह विविध पक्ष-संघटनांनी केलेलं आंदोलन केलं होतं. तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही धार्मिकस्थळं सुरू करण्यासाठी राज्य सरकारला सूचना केल्या होत्या. त्यावरून मुख्यमंत्री-राज्यपालांमध्ये लेटरवॉरही झाला. मात्र, तरीही धार्मिकस्थळं सुरू न करण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम राहिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (no decision of reopen religious places in maharashtra)
केंद्र सरकारने धार्मिकस्थळं सुरू करण्यासाठी परवानगी दिल्यानंतर राज्यातही धार्मिकस्थळं सुरू करण्याच्या मागणीने जोर धरला होता. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने पंढरपुरात आंदोलन केलं होतं. तर एमआयएमने औरंगाबादमध्ये मंदिरं सुरू करण्यासाठी आंदोलनाची हाक दिली होती. भाजपनेही मंदिरं सुरू करण्यासाठी घंटानाद केला होता. कालही भाजप आणि काही धार्मिक संघटनांनी धार्मिकस्थळं सुरू करण्यासाठी राज्यभर आंदोलने केली होती. मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरासमोर झालेल्या भाजपच्या आंदोलनात पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांची बाचाबाचीही झाली होती. भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनावेळी सिद्धिविनायक मंदिराबाहेर सिद्धिविनायकच्या प्रतिकात्मक मूर्तीची पूजा करून आरतीही घेण्यात आली होती. या आंदोलनावेळी पोलिसांनी काही भाजप कार्यकर्त्यांना ताब्यातही घेतलं होतं.
तर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहून त्यांना धार्मिकस्थळं सुरू करण्याची सूचना केली होती. तसेच त्यांना त्यांनी केलेल्या विठ्ठल-रुक्मिनी मंदिरातील पूजेची आठवण करून देतानाच हिंदुत्वाचीही आठवण करून दिली होती. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनीही राज्यपालांना पत्रं लिहून आम्हाला हिंदुत्वासाठी तुमच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचं सांगितलं होतं. राज्यपाल-मुख्यमंत्र्यांच्या या लेटर वॉर नंतर दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये काल दिवसभर शाब्दिक तोफा झडत होत्या. त्यातच संध्याकाळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद मोदींना पत्रं लिहून राज्यपालांच्या पत्रातील भाषेवर आक्षेप घेत थेट मोदींकडे राज्यपालांची तक्रार केली होती.
या संपूर्ण पार्श्वभूमीवर राज्यसरकारकडून संख्येचं बंधन घालून धार्मिकस्थळं सुरू करण्यास परवानगी दिली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आज जाहीर झालेल्या अनलॉकच्या नियमावलीतून त्याबाबतच साफ निराशा झाली आहे. या नव्या नियमावलीत धार्मिकस्थळांचा उल्लेखही करण्यात न आल्याने धार्मिकस्थळं बंदच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
MISSION BEGIN AGAIN : देवालय बंद, ग्रंथालये उघडली, नव्या नियमावलीनुसार काय सुरु, काय बंद?#UddhavThackeray #MissionBeginAgain #metro #internationaltravelhttps://t.co/HNPyy0gu4H
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 14, 2020
या गोष्टी सुरू होणार (कंटेन्मेंट झोन वगळता)
संबंधित बातम्या:
मुंबई मेट्रो उद्यापासून धावणार, ग्रंथालयेही सुरु, शाळा-कॉलेज 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच!
भारतीय व्यापाऱ्यांचा चीनला 40 हजार कोटींचा झटका, दिवाळीला ‘मेड इन चायना’वर बंदी