मुंबई: लॉकडाऊननंतर नव्या रंगाढंगात आलेल्या ‘चला हवा येऊ द्या’मध्ये सध्या राजकीय वारे वाहत आहेत. राज्यातील तीन महत्त्वाच्या राजकीय घराण्यातील नेत्यांना बोलावून या कार्यक्रमात धम्माल मस्ती करण्यात आली. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि त्यांचे पती अमित पालवे, राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार आणि भाजपचे खासदार सुजय विखे-पाटील आणि धनश्री सुजय विखे-पाटील या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी अमित पालवे आणि धनश्री विखे यांना एक टास्क देण्यात आला. त्यावरून राजकीय शेरेबाजी रंगली. पंकजा मुंडे यांनी त्यांच्या नवऱ्याला आणि धनश्री यांना रोहित पवार फोडत असल्याचा आरोप केला. त्यावर रोहित यांनी तसंच मिश्किल उत्तर देऊन प्रेक्षकांची करमवणूक केली. (Pankaja Munde taunt Rohit Pawar over party politics in Chala Hawa Yeu Dya)
‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि त्यांचे पती अमित पालवे, राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार आणि भाजपचे खासदार सुजय विखे-पाटील आणि त्यांच्या पत्नी धनश्री सुजय विखे-पाटील आदी सहभागी झाले होते. यावेळी राजकीय शेरेबाजी रंगली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक निलेश साबळे यांनी यावेळी धनश्री विखे आणि अमित पालवे यांना एक टास्क दिला. त्यानुसार टेबलापासून थोड्या अंतरावर उभं राहून टेबलावरील वस्तूंवर रिंग टाकून त्या शोधायच्या होत्या. यावेळी अमित पालवे यांनी रिंग टाकली तेव्हा ती नेल पॉलिशवर पडली. तर, धनश्री यांनी टेबलाच्या दिशेने रिंग फेकताच योगायोगाने ती रिंग घड्याळावर जाऊन पडली. मग काय? त्यावरून राजकीय फटाके उडण्यास सुरुवात झाली.
धनश्री यांनी घड्याळ्यावर रिंग टाकल्याचं टायमिंग साधून पंकजा यांनी मार्मिक कमेंट केली. “यांना वाटतं मी नेल पॉलिश लावून घड्याळ घालावं. सुजयची बायको आणि माझ्या नवऱ्याला फोडण्याचं काम रोहित पवार करत आहेत. माझ्या घरच्यांना तुम्ही नका हो फोडू,” असं पंकजा यांनी हात जोडून मिश्किल भाष्य करताच सेटवर एकच खसखस पिकली. अर्थात पंकजा यांचे बंधू धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीत आहेत. पंकजा यांनी रोहित यांना लगावलेल्या टोमण्या मागचा हा संदर्भ होता.
रोहित यांचे राजकीय फटाके
रोहित पवार हे राजकारणात नवे असले तरी ते राजकारणातील मातब्बर अशा पवार घराण्यातील आहेत. त्यामुळे पंकजा यांच्या या टोमण्याला उत्तर देणार नाहीत ते पवार कसले? रोहित यांनीही तितक्याच दिलखुलासपणे हसत हसत पंकजा यांना टोला लगावला. “घरच्यांनाही माहीत असतं आपल्या माणसासाठी काय योग्य असतं?” असा चिमटा रोहित यांनी काढताच सेटवरील सर्वच जण हसून हसून लोटपोट झाले.
खेळीमेळीचं वातावरण
राजकीय मैदानात मुंडे आणि पवार या दोन दिग्गज कुटुंबांचा दबदबा आहे. विखे कुटुंबाचंही अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात बडं प्रस्थ आहे. दोन वेगवेगळ्या पक्षात असलेल्या या नेत्यांमध्ये राजकीय आखाड्यात तुफान सामना रंगताना दिसतो. विखे आणि पवार कुटुंबात विस्तवही जात नसल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर हजेरी लावल्यानंतर राजकीय नेत्यांमध्ये अत्यंत खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळालं. (Pankaja Munde taunt Rohit Pawar over party politics in Chala Hawa Yeu Dya)
कोण आहेत अमित पालवे
चारुदत्त ऊर्फ अमित पालवे हे पंकजा मुंडे यांचे पती आहेत. अमित पालवे हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. तसेच ते उद्योजकही आहेत. पंकजा आणि अमित यांना आर्यमन नावाचा एक मुलगाही आहे. पुण्यात त्यांची सॉफ्टवेअर कंपनीही आहे.
धनश्री विखे-पाटील
धनश्री विखे-पाटील यांचं माहेरचं आडनाव धनश्री कुंजीर असं आहे. त्यांचे वडील बांधकाम व्यावसायिक आहेत. धनश्री यांनी बी. सी. एस. आणि नंतर फायनान्समध्ये एमबीए केलं आहे. 2010मध्ये त्यांचा डॉ. सुजय विखे यांच्याशी विवाह झाला. या दाम्पत्याला अनिशा नावाची मुलगी आहे. धनश्री या राजकारणात जास्त नसल्या तरी सक्रिय आहेत. त्यांनी सुरुवातीला त्यांच्या सासूने निर्माण केलेल्या रणरागिणी महिला बचत गटात लक्ष घालण्यास सुरुवात केली. त्या या बचत गटाच्या अध्यक्षा आहेत. त्या शाळाही चालवतात. या शिवाय त्यांनी लोकसभा निवडणुकीत डमी उमेदवार म्हणून नगरमधून उमेदवारी अर्जही दाखल केला होता. पण एकाच पक्षाच्या दोन उमेदवारांचे अर्ज आल्याने त्यांचा अर्ज बाद झाला होता. (Pankaja Munde taunt Rohit Pawar over party politics in Chala Hawa Yeu Dya)
VIDEO | TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 9 PM | 13 December 2020 https://t.co/Dgvknd6y8y #TopNews #fastnews
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 13, 2020
संबंधित बातम्या:
जेव्हा पंकजांसमोर साक्षात अजित पवार-शरद पवार अवतरतात…
रोहित, माझ्या सगळ्या व्यक्तींना फोडू नका हो, थुकरटवाडीत पंकजांचा टोला
‘चला हवा येऊ द्या’त राजकीय वारे, थुकरटवाडीत रोहित-पंकजा-सुजय
(Pankaja Munde taunt Rohit Pawar over party politics in Chala Hawa Yeu Dya)