अहमदनगर : पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांनी कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वतः मैदानात उतरले आहेत. त्यांनी स्वतः आपल्या मतदारसंघात निर्जंतूकीकरण फवारणी केली (MLA Nilesh Lanke spraying disinfectant). या रोगामुळे अनेकजण घराबाहेर पडण्यास तयार नाही. या रोगाच्या भितीने अनेक कर्मचारी फवारणी करण्यासही घाबरत आहेत. म्हणूनच आपण स्वतः फवारणीचा निर्णय घेतल्याचं मत आमदार निलेश लंके यांनी सांगितलं.
आमदार निलेश लंके आपल्या साध्या राहणीसाठी ओळखले जातात. काही दिवसांपूर्वीच ते कार्यकर्ता आपल्या जागेवर आराम करत असल्याचं पाहून जमिनीवर चटई अंथरुन झोपले होते. त्यांच्या या साधेपणाचा त्यांच्या आजूबाजूला असलेल्या अनेकांना अनुभव आल्याचं बोललं जातं. आता कोरोनाच्या लढाईतही त्यांनी स्वतः पाठिवर पंप घेऊन पारनेर तालुक्यात अनेक भागांमध्ये फवारणी केली. अनेक ठिकाणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने देखील फवारणी केली. आपला आमदार स्वतः जमिनीवर उतरुन फवारणीचं काम करत असल्याचं पाहून लंके यांचं नागरिकांकडून चांगलंच कौतुक होत आहे. त्यांच्या कामावरुन प्रोत्साहन घेऊन कर्मचाऱ्यांनीही जोमाने कामाला सुरुवात केली आहे.
राज्यात कोरोनाचं थैमान सुरु असताना सुरक्षेचा प्रश्न म्हणून अनेक आमदार आपल्या मतदारसंघात फिरकतानाही दिसत नाही. या स्थितीत अनेक आमदार गायब होत असताना लंके यांनी स्वतः रस्त्यावर उतरून फवारणी केली. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
यशवंतराव गडाखांकडून कोरोनाविरोधातील लढण्यासाठी 5 लाख रुपयांची मदत
दरम्यान, ज्येष्ठ नेते व साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी वैयक्तिकणे 5 लाख रुपयांची मदत केली आहे. या रकमेचा धनादेश त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या खात्यावर जमा केला आहे. सध्या संपूर्ण देशाला चिंतेत टाकणाऱ्या कोरोना आजाराशी लढण्यासाठी सरकारला मोठ्या निधीची गरज लागणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने मुख्यमंत्री निधीसाठी यथाशक्ती मदत करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्यालाच गडाख यांनी प्रतिसाद दिला.
‘कोरोनामुळे सगळे उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत. कोट्यावधी हातांची रोजीरोटी हिरावली गेली आहे. त्यामुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. मोठ्या संख्येने लोक स्वत:चे गाव सोडून इतर भागात अडकून पडले आहेत. त्यांच्या पोटापाण्याची आणि खुशालीची मोठी समस्या उभी राहिली आहे. अशा सर्व गरजूंना हातभार म्हणून या निधीचा वापर व्हावा’ अशी अपेक्षा यशवंतराव गडाख यांनी व्यक्त केली आहे. तसेच गरज लागेल तेव्हा आपल्या सर्वांना अजून त्या निधीत भर टाकावी लागणार आहे असंही मत व्यक्त केलं.
‘कोरोना हे एक मोठे सामाजिक संकट आहे. त्याचा मुकाबला फक्त सरकार करू शकणार नाही. त्यात आपल्या सर्वांनाच सहभागी व्हावे लागेल. सध्या सर्वांनी सरकारच्या सूचनांचे काटेकोर पालन केले पाहिजे. संयम ठेवून घरी थांबले पाहिजे व आरोग्याची सर्व प्रकारे काळजी घेतली पाहिजे. एकमेकांच्या सहकार्याने व एकजुटीने आपण नक्कीच हे संकट संपवू शकतो. या प्रश्नामध्ये पक्ष, राजकारण, आपसातील वाद कुणीही आणू नये, असं आवाहनही गडाख यांनी केलं.
MLA Nilesh Lanke spraying disinfectant