चंदीगड : कोरोनाचा सामना करण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊनचं पालन करत असताना (Patiala nihangs attack on Police) पंजाबच्या पतियाळामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पतियाळामध्ये निहंग शीखांच्या जमावाने पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा हात कापला गेला आणि इतर पोलीस कर्मचारीदेखील जखमी झाले. ही घटना आज सकाळी पातियाळाच्या भाजी मार्केटजवळ घडली. याप्रकरणी पोलिसांनी 7 आरोपींना ताब्यात घेतलं आहे (Patiala nihangs attack on Police).
निहंग शीख एका कारमधून आले होते. त्यांना भाजी मार्केटमध्ये खरेदीसाठी जायचं होतं. भाजी मार्केटजवळील नाक्यावर पोलिसांनी बॅरिकेट्स लावले होते. निहंग शिख नाक्यावर पोहोचल्यावर त्यांच्याकडून पोलिसांनी कर्फ्यू पास मागितला. यावरुन पोलीस आणि त्यांच्यात वाद झाला. या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. निहंग शीखांनी पोलिसांवर हल्ला केला. यात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. या हल्ल्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हरजीत सिंग यांचा तर हातच कापला गेला.
पोलिसांवर हल्ला केल्यानंतर आरोपींनी बॅरिकेट्स तोडत धूम ठोकली. या हल्ल्यात पोलीस कर्माचाऱ्यांसोबतच भाजी मार्केट बोर्डाचे अधिकारीदेखील जखमी झाले. तर एका निहंगी शीखाला गोळी लागल्यामुळे तो जखमी झाला आहे. पतियाळाच्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
ASI Harjeet Singh whose hand was cut-off in an attack by a group of Nihangs at Sabzi Mandi, in Patiala (Punjab) today, is undergoing surgery at PGI Chandigarh. As per Punjab Special Secreatry KBS Sidhu, 7 people have been arrested in connection with the incident. pic.twitter.com/8B5zgj0RuB
— ANI (@ANI) April 12, 2020
दरम्यान, पंजाबचे पोलीस महासंचालक दिनकर गुप्ता यांनी या घटनेची दखल घेतली आहे. जखमी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हरजीत सिंग यांना चंदिगडच्या पीजीआयमध्ये दाखल करण्यात आलं आहे. तिथे त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तर इतर चार जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना पतियाळाच्या राजिंदरा या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती दिनकर गुप्ता यांनी दिली.
हल्लेखोर घटनास्थळावरुन फरार होऊन एका गुरुद्वारात लपले आहेत. या गुरुद्वाराला पोलिसांनी चारही बाजूंनी घेरले आहे. लपून बसलेल्या हल्लेखोरांना पोलिसांनी समोरुन शरण येण्याचं आवाहन केलं आहे. दरम्यान, याप्रकरणी सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.