प्रदूषण आणि मोठ्या आवाजामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. हे तुम्हाला माहिती आहे का? अलिकडेट एक संशोधन समोर आलं आहे. त्यानुसार, विमानतळाजवळ राहणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा धोका असल्याचं संशोधनात म्हटलं आहे. सविस्तर जाणून घेऊया.
तुम्ही विमानतळाजवळ राहत असाल तर ही बातमी नक्की वाचा. विमानतळाजवळ राहणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा झटका आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो. नुकत्याच झालेल्या एका संशोधनात ही बाब समोर आली आहे.
संशोधनात असे आढळले आहे की, ज्या लोकांचे घर विमानतळाजवळ आहे त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता इतर लोकांपेक्षा जास्त असते. याचे मुख्य कारण म्हणजे वायू प्रदूषण आणि मोठा आवाज. प्रदूषण आणि मोठ्या आवाजामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो.
हे वृद्धांपुरते मर्यादित नसून तरुणांवरही त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो, असेही संशोधनात नमूद करण्यात आले आहे. अशा आवाजाच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास हृदयविकाराचा झटका आणि इतर हृदयव रक्तवाहिन्यासंबंधी आजारांचा धोका वाढतो.
जर्नल ऑफ द अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, विमानतळांजवळील असलेल्या भागात राहणाऱ्या लोकांच्या हृदयाची रचना आणि कार्य या भागांपासून दूर असलेल्या लोकांपेक्षा 10 ट्के ते 20 टक्के खराब असल्याचे आढळले.
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या एका अभ्यासात असे आढळले आहे की, विमानतळाजवळ राहणाऱ्या लोकांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. ही समस्या प्रामुख्याने ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषणामुळे उद्भवते, जी विमानांचे टेकऑफ, लँडिंग आणि विमानतळाशी संबंधित रहदारीमुळे उद्भवते.
पीएसआरआय हॉस्पिटलचे वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रवी प्रकाश सांगतात की, विमानतळाजवळ सतत आवाज आणि प्रदूषणाच्या संपर्कात राहिल्याने शरीरावर ताण येतो. ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. अशा लोकांना हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि हृदयाचे ठोके अनियमित होण्याची शक्यता असते.
विमान आणि ट्रॅफिकमधून निघणारे आवाज 24 तास लोकांच्या कानापर्यंत पोहोचतात, त्यामुळे मेंदूत तणाव निर्माण होतो. त्याचबरोबर आवाजामुळे रक्तदाब ही वाढतो आणि हृदयावर अतिरिक्त ताण पडतो.
विमानतळाभोवतीचे वायू प्रदूषणही आरोग्याच्या समस्येला कारणीभूत आहे. विमानातून निघणारे विषारी वायू आणि ट्रॅफिकमधून निघणारा धूर यामुळे बहुतांश लोक आजारी पडत आहेत. वायू प्रदूषणामुळे लोकांच्या फुफ्फुसांवर आणि हृदयावर नकारात्मक परिणाम होत आहेत. बहुतेक लोक श्वसनाच्या आजारांनी त्रस्त आहेत.