नवी दिल्ली : ‘कोरोना व्हायरस’चा संसर्ग रोखण्यासाठी जगभरातील अनेक देश लॉकडाऊनची पद्धत अवलंबत आहेत. भारतीय जनताही जवळपास गेल्या एका महिन्यापासून आपापल्या घरात लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनमुळे सामान्य नागरिकच नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदीही दिल्लीबाहेर जाऊ शकलेले नाहीत. पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्याहून परतून 5 महिने 6 दिवस झाले. पंतप्रधान झाल्यापासून सहा वर्षात दुसऱ्यांदाच ते सलग इतके दिवस देशात आहेत. (PM Narendra Modi No Foreign Tour since last Five Months)
इतक्या मोठ्या कालावधीत परदेश दौरा न करताही जगातील राष्ट्रप्रमुखांशी मोदींचे संबंध दृढ आहेत. अनेक देशांनी मोदींनी योजलेल्या उपायांचं कौतुक केलं आहे. ‘कोरोना’ संकटकाळात हायड्रोक्सिक्लोरोक्वीन सारख्या महत्त्वाच्या औषधाचा पुरवठा भारताने अनेक देशांना केला आहे.
नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी 2016-17 मध्ये सलग सहा महिने एकही परदेश दौरा केला नव्हता. त्यावेळी मोदी 12 नोव्हेंबर 2016 रोजी जपानहून परत आले होते. त्यानंतर थेट 11 मे 2017 रोजी ते श्रीलंकेला गेले. अर्थात, त्यावेळी देशात विधानसभा निवडणुकांचं वातावरण होतं. मार्च 2017 मध्ये उत्तर प्रदेशसह उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यात निवडणुका होत्या.
आतापर्यंत मोदींचे परदेश दौरे
नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन जवळपास 5 वर्षे 11 महिन्यांचा कालावधी झाला. 26 मे 2014 रोजी पहिल्यांदा, तर 30 मे 2019 रोजी दुसऱ्यांदा नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान कार्यालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार मोदी 2014 पासून आतापर्यंत 59 वेळा परदेश दौऱ्यावर गेले आहेत. ‘दैनिक भास्कर’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.
काही वेळा एकाच दौऱ्यात अनेक देश समाविष्ट असल्याने त्यांचा 106 देशांमध्ये (काही देशात दोन किंवा अधिक वेळा) प्रवास झाला आहे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून दरवर्षी दहापेक्षा जास्त परदेश दौऱ्यांवर जातात.
हेही वाचा : कोरोनाविरोधातील लढ्यात जगातील टॉप 10 नेत्यांमध्ये मोदी पहिल्या स्थानावर, डोनाल्ड ट्रम्प कितवे?
डिसेंबर 2018 मध्ये तत्कालीन परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह यांनी राज्यसभेला दिलेल्या उत्तरात पंतप्रधानांच्या परदेश दौर्यावर झालेल्या खर्चाची माहिती दिली होती. यानुसार, 2018-19 पर्यंत मोदींच्या परदेश प्रवासात 2,021.54 कोटी रुपये खर्च झाले. यानंतर, मोदींनी 14 दौरे केले. यावर 90.70 कोटी खर्च झाल्याचा अनुमान आहे. या खर्चामध्ये पंतप्रधानांच्या विमानांची देखभाल आणि हॉटलाईनचा समावेश नव्हता.
दुसऱ्यांदा सलग सहा महिने मायदेशी (PM Narendra Modi No Foreign Tour since last Five Months)
नोव्हेंबर 2016 ते मे 2017 या सहा महिन्यात नरेंद्र मोदींनी एकही परदेश दौरा केला नव्हता. विधानसभा निवडणुकांमुळे नोव्हेंबर 2016 ते मार्च 2017 दरम्यान मोदींनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या 5 राज्यांना 38 वेळा भेटी दिल्या होत्या. यापैकी सर्वाधिक 27 दौरे एकट्या उत्तर प्रदेशमध्ये केले. त्यावेळी निवडणुकीत भाजपने यूपीतील 403 पैकी 325 जागा जिंकल्या होत्या. पाचपैकी चार राज्यात भाजपने सरकार स्थापन केले होते. एकट्या पंजाबमधील सरकार भाजपला गमवावे लागले होते.
रद्द झालेले दौरे
13 मार्च 2020 – बेल्जियम – भारत-युरोपीय शिखर परिषद
17 मार्च 2020 – बांगलादेश – बांगलादेशचे पहिले राष्ट्रपती शेख मुजीबुर्ररहमान यांचा जन्मशताब्दी सोहळा
Discussed COVID-19 pandemic with Ireland’s PM, Mr. @LeoVaradkar. India and Ireland share similar approaches on many global issues. We will work together to further strengthen our partnership in health, science & technology, to jointly address challenges of the post-COVID world.
— Narendra Modi (@narendramodi) April 22, 2020