पुणे: संपूर्ण जगाला भय आणि मृत्यूच्या दारात लोटणाऱ्या कोरोना विषाणूवरील लस आता अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लस निर्मिती करणाऱ्या देशातील महत्त्वाच्या संस्थाना भेटी दिल्या. हैदराबाद आणि अहमदाबादनंतर त्यांनी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट घेऊन कोरोना लसीच्या निर्मितीचा आढावा घेतला. तब्बल सव्वा तास पंतप्रधान मोदी सिरममध्ये होते. (PM Narendra Modi visited Serum Institute in pune)
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी नियोजित वेळेनुसार पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले. लोहगाव विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी थेट सिरम इन्स्टिट्यूट गाठले. मोदी यांचं सिरममध्ये आगमन होताच सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख आदर पुनावाला आणि त्यांच्या पत्नीने मोदींचे हातजोडून स्वागत केले. त्यानंतर मोदी यांनी लस निर्मितीच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कॉन्फरन्स रुममध्ये जाऊन शास्त्रज्ञांशी संवाद साधला. लस कधीपर्यंत तयार होईल? ही लस किती परिणामकारक असेल? दिवसाला किती लसींची निर्मिती होऊ शकते? आदी विविध बाबींची त्यांनी यावेळी माहिती घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी तब्बल सव्वा तास या इन्स्टिट्यूटमध्ये होते. यावेळी त्यांनी संशोधकांच्या कामाची स्तुती करत त्यांना प्रोत्साहन दिल्याचंही समजतं.
सिरम इन्स्टिट्यूटमध्ये सध्या अॅस्ट्रा झेनेका लसीवर चाचणी सुरू आहे. सिरम संस्थेने अॅस्ट्रा झेनेका (Astra Zeneca) नावाच्या कंपनीकडून ही लस तयार करण्याचे हक्क खरेदी केले असून या लसीवरचं संशोधन अंतिम टप्प्यात आहे.
त्याआधी मोदींनी अहमदाबादमध्ये जायडस बायोटेक पार्कमध्ये जाऊन कोरोना लसीची पाहणी केली. यावेळी त्यांनी कोरोना लस बनविणाऱ्या संशोधकांची स्तुती केली. मोदींनी या संस्थेला भेट दिल्यानंतर त्यांनी विश्व कल्याणाची कामना व्यक्त केली, असं ट्विट जायडस कॅडिलाचे चेअरमन पंकज पटेल यांनी केलं. आत्मनिर्भर भारताचे 25000 जायडसचे कर्मचारी आणि 18000 संशोधक दिवसरात्र लस निर्मितीच्या कामाला लागलेले आहेत, असंही त्यांनी म्हटलं आहे. (PM Narendra Modi visited Serum Institute in pune)
पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून समाधान व्यक्त केलं आहे. सिरममधील टीमशी आज संवाद साधला. त्यांनी सर्व माहिती दिली आहे. कोरोना लस प्रगती पथावर असल्याची माहिती आणि या लसीच्या वितरणाबाबतचे संस्थेचे नियोजन याची माहिती सिरममधील टीमने दिली, मी स्वत: त्यांच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला आहे, असं मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Had a good interaction with the team at Serum Institute of India. They shared details about their progress so far on how they plan to further ramp up vaccine manufacturing. Also took a look at their manufacturing facility. pic.twitter.com/PvL22uq0nl
— Narendra Modi (@narendramodi) November 28, 2020
संबंधित बातम्या:
Photo : कोरोनाच्या लसीची जय्यत तयारी; पंतप्रधान नरेंद्र मोदी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये!
(PM Narendra Modi visited Serum Institute in pune)