अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण सुटल्याने मोदींची शेतकऱ्यांवर वक्रदृष्टी; पृथ्वीराज चव्हाणांची टीका

| Updated on: Nov 05, 2020 | 2:24 PM

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणा विरोधात काँग्रेसने आज कोल्हापुरात 'ट्रॅक्टर रॅली'चं आयोजन केलं आहे. या रॅलीत काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते सामिल झाले असून अनेक कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टरसह रॅलीत सहभाग घेतला आहे. त्यामुळे हा संपूर्ण परिसर घोषणा आणि निदर्शनांनी गजबजून गेला असून या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण सुटल्याने मोदींची शेतकऱ्यांवर वक्रदृष्टी; पृथ्वीराज चव्हाणांची टीका
Follow us on

कोल्हापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं देशाच्या अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण सुटलं आहे. त्यामुळे सरकारी कंपन्या विकण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. म्हणूनच आता त्यांची वक्रदृष्टी आता शेतकऱ्यांवर पडली आहे, अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (prithviraj chavan ) यांनी केली आहे. ते ‘ट्रक्टर रॅली’त बोलत होते. (prithviraj chavan address congress tractor rally at kolhapur)

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात काँग्रेसने आज कोल्हापुरात ‘ट्रॅक्टर रॅली’चं (tractor rally) आयोजन केलं आहे. गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांच्या नियोजनात ही रॅली सुरू आहे. या रॅलीत काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते सामिल झाले असून अनेक कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टरसह रॅलीत सहभाग घेतला आहे. त्यामुळे हा संपूर्ण परिसर घोषणा आणि निदर्शनांनी गजबजून गेला असून या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या रॅलीला संबोधित करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी कृषी कायद्यावरून भाजपला घेरले. शेती हा विषय खूप मोठा आहे. त्यामुळे हा विषय राज्यांकडे सोपवण्यात आला होता. प्रत्येक राज्यातील परिस्थिती वेगवेगळी असल्याने दिल्लीत बसून बादशाही निर्णय होऊ नये म्हणून हा विषय राज्यांकडे देण्यात आला होता, असं सांगतानाच मात्र, केंद्राने तरीही कृषी विषयक कायदे केले आहेत. हे कायदे करताना विरोधकांशी चर्चा केली होती का? विरोधक सोडा. तुमच्या मित्रपक्षांना तरी विचारलं होतं का? असा सवाल करतानाच हम करे सो कायदा हा मोदींचा स्वभाव आहे. हा त्यांचा हट्टीपणा आहे. त्यामुळेच त्यांनी हा कायदा दामटून नेण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली. देशाच्या अर्थव्यवस्थेवरील मोदींचं नियंत्रण सुटलं आहे. त्यांना सरकारी कंपन्या विकण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच त्यांची वक्रदृष्टी शेतकऱ्यांवर पडली असल्याची टीकाही त्यांनी केली.

केंद्राच्या कायद्याविरोधात राज्यांमध्ये कायदे पास केले जात आहेत. महाविकास आघाडीनेही एकत्र येऊन त्यावर निर्णय घेतला पाहिजे. महाराष्ट्रातही वेगळा कायदा करता येईल, असं सांगतानाच राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांकडून संभ्रम पसरविला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं.

तर पुढची पिढी माफ करणार नाही: सतेज पाटील

यावेळी सतेज पाटील यांनी ही शेतकऱ्यांना कृषी कायद्याविरोधात उभं राहण्याचं आवाहन केलं. आता आपण गप्प बसलो तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही, असंही राज्याचे गृहराज्य मंत्री सतेज पाटील म्हणाले. कृषी कायदा जर शेतकऱ्यांच्या हिताचा होता तर तो अंधारात पास कसा केला? असा सवाल करतानाच उभं पीक नासवायचं काम भाजप करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. जिओ आल्यानंतर बीएसएनएल बंद पडली. तशीच अवस्था देशातील सर्व उद्योगांची होणार असल्याचा दावाही त्यांनी केला.

हा वणवा केंद्राला नेस्तनाबूत करेल: थोरात

यावेळी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली. हा पेटलेला वणवा केंद्र सरकाला नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देतानाच एक दिवस आपला येईल. तो दिवस शेतकऱ्यांचाच असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारचे निर्णय केवळ शेतकऱ्यांच्याच विरोधातील नसून सामान्य नागरिकांच्याही विरोधातील असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्राच्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचा माल स्वस्त होणार असून साठेबाजी वाढणार असल्याचा दावाही थोरात यांनी केला.

 

मोदी खोटं बोलून सत्तेवर: पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे बोलत असून खोटे बोलून सत्तेवर आले आहेत. पण मोदींचं खरं रुप आता लोकांना कळायला लागले आहे, असं काँग्रेस नेते एच. के. पाटील यांनी म्हटलं आहे. मोदी सरकारने 20 लाख कोटीचं पॅकेज जाहीर केलं. पण लोकांना एक पैसाही मिळाला नाही. मग हे 20 लाख कोटी कुठे गेले? असा सवालही त्यांनी केला.

राष्ट्रपतींना सह्यांचे निवेदन देणार

केंद्र सरकारकडून प्रत्येक वर्षी नवे रोजगार निर्माण केले जात असल्याचा दावा केला जात असून प्रत्यक्षात काहीही घडताना दिसत नाही. त्यामुळेच बिहारमध्ये मोदींच्या सभेला शेतकरी फिरकलेही नसल्याचा दावा पाटील यांनी केला. मोदींना व्यापाऱ्यांचे कर्ज माफ करायला वेळ आहे. पण शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला वेळ नाही, असं सांगतानाच शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात राष्ट्रपतींना शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. (prithviraj chavan address congress tractor rally at kolhapur)

 

संबंधित बातम्या:

सतेज पाटलांच्या हाती स्टिअरिंग, कोल्हापुरात काँग्रेसची ट्रॅक्टर रॅली, थोरात, पृथ्वीराज चव्हाणांची हजेरी

…तर शेतकऱ्यांच्या पायावर धोंडा पाडणारं कृषी धोरण स्वीकारणार नाही; मुख्यमंत्र्यांचा इशारा

कृषी विधेयक महाराष्ट्रात लागू होणार नाही, याची काळजी घेऊ : बाळासाहेब थोरात

(prithviraj chavan address congress tractor rally at kolhapur)