मुंबई : “चिनी सैनिक मागे सरकण्याऐवजी पेट्रोलिंग पॉईंट 14 आणि गलवान नदी खोऱ्यात तंबू बांधण्याचं काम वेगाने करत आहेत (Prithviraj chavan ask question to Pm Narendra Modi). ही माहिती सॅटेलाईटच्या छायाचित्रांमधून मिळाली आहे. पूर्व लडाखच्या एकूण क्षेत्रामध्ये चीनचा तोफखाना आणि आर्म रेजिमेंट यासह जवळपास 10 हजार सैनिक असल्याचं स्पष्ट होत आहे. ही माहिती खरी आहे का? यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टीकरण द्यावं”, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत (Prithviraj chavan ask question to Pm Narendra Modi).
गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या झडपमध्ये भारताच्या शहीद जवानांना काँग्रेसकडून श्रद्धांजली वाहिली गेली. काँग्रेसकडून आज ‘शहिदों को सलाम दिवस’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. दरम्यान, महाराष्ट्रात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला प्रश्न विचारले.
पृथ्वीराज चव्हाण नेमकं काय म्हणाले?
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्यावतीने कर्नल संतोष बाबू यांच्यासह 16 जवानांच्या शौर्याचे आणि बलिदानाचे आदरपूर्ण स्मरण करत कृतज्ञतेच्या भावनेने आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहोत. काँग्रेस पक्षाचा शहिदांच्या कर्तृत्वाला सलाम आहे. देशाच्या संरक्षण संदर्भात सरकारकडून घेण्यात येणाऱ्या सर्व निर्णयांचे समर्थन करण्याचे अभिवचन काँग्रेस पक्षाने केंद्रीय पातळीवर दिलं आहे.
लडाखच्या गलवानमधील खोऱ्यात चीनने केलेल्या अतिक्रमणाबद्दल आम्हाला चिंता आहे. चीनने केलेली घुसखोरी आम्हाला कदापी मान्य नाही. काँग्रेस पक्षाने मे महिन्यापासून चिनी घुसखोरीचा मुद्दा मांडला. मात्र, सरकार आणि त्यांचे मित्रपक्ष आमच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी दिशाभूल करणाऱ्यात मग्न आहेत. आपल्या देशाच्या भूमीचं संरक्षण करणं आणि चिनी सैनिकांची घुसखोरी थांबवणं हे केंद्र सरकारचं आद्य कर्तव्य आहे. ते घटनात्मक कर्तव्य आहे.
हेही वाचा : सिंधुदुर्गातील वादळग्रस्तांना दमडीचीही मदत नाही, ठाकरे सरकारचा कोकणावर कुठला राग? : नितेश राणे
सरकारमध्ये असणारा विरोधाभस स्पष्ट झाला आहे. 3, 17 आणि 20 जून रोजी संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, परराष्ट्र खातं यांनी वेगवेगळ्या पद्धतीने अधिकृत वक्तव्यं केलेली आहेत. “चिनी सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. भारताच्या गस्त घालण्याच्या कामातही अडथळा निर्माण केला जात आहेत. 6 जून 2020 पर्यंत प्रत्यक्ष ताबा रेषेस भारताच्या बाजूला गलवान खोऱ्यात बांधकाम केलं गेलं आहे”, हे सर्व अधिकृत वक्तव्य आहेत.
हे सर्व अधिकृत वक्तव्य असताना विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक गंभीर वक्तव्य केलं. ‘भारतीय हद्दीत कुणीही घुसलेलं नाही. अतिक्रमण झालेलं नाही. आमची एकही चौकी दुसऱ्या कुणाच्या ताब्यात नाही’. या सर्व वक्तव्यामुळे आधीच्या सर्व वक्तव्याचं खंडन झालं. त्यामुळे पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयाला सारवासारव करावं लागलं. कारण या वक्तव्याचे अतिशय गंभीर परिणाम झाले.
हेही वाचा : मंत्रालयात सचिवांची कुरबूर वाढली, मुख्य सचिवांच्या नियुक्ती आदेशावर उपसचिवांची सही
या वक्तव्यामुळे चीनने भारताच्या पंतप्रधानांचे कौतुक केलं. त्यांनी जगाला सांगितलं की, “भारताचे पंतप्रधान स्वत: सांगत आहेत की, चीनने कुठलंही अतिक्रमण केलेलं नाही”. मोदी चीनमध्ये फार लोकप्रिय झाले आहेत, असंही समजत आहे. पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा पूरेपूर फायदा चीन सरकारने घेतला आहे. यावर डॉ. मनमोहन सिंग यांनी अतिशय गांभीर्याने प्रतिक्रिया दिली आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणतेही शब्द आणि घोषणा करताना त्याचे परिणाम काय होतील, या गोष्टींबाबत सावध राहीलं पाहिजे. मोदींना आपल्या वक्तव्यांमधून चीनच्या षडयंत्रला चालना मिळायला नको. चीनला बळ मिळायला नको”, असं माजी पंतप्रधान मनमोहन सिंह म्हणाले आहेत.
ज्यावेळी देशाच्या लोकशाहीला धोका निर्माण होतो त्यावेळी प्रश्न उपस्थित करणं आणि सरकारकडून स्पष्टीकरण मागणं हे विरोधकांचे कर्तव्य आहे. तसंच विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना सरकारने प्रामाणिकपणे उत्तर देणं, सरकारचीदेखील तितकीच जबाबदारी आहे.
काही नवीन गोष्टी समोर आलेल्या आहेत. चिनी सैनिक मागे सरकण्याऐवजी पेट्रोलिंग पॉईंट 14 आणि गलवान नदी खोऱ्यात तंबू बांधण्याचं काम वेगाने करत आहेत. ही माहिती सॅटेलाईटच्या छायाचित्रांमधून मिळाली आहे.
माजी सेना कमांडर जनरल डी एस हुड्डा यांचं जे वक्तव्य आलं आहे ते फार गंभीर आहे. ते म्हणतात, उपग्रहाच्या छायाचित्राच्या माध्यमातून गलवान नदीच्या पात्रामध्ये नवे रस्ते बांधण्याचं काम सुरु आहे.
मात्र, मोठ्या प्रमाणात सैन्याची वाहने आणि बुलडोझर स्पष्टपणे चित्रात दिसतात. त्याचबरोबर पूर्व लडाखच्या एकूण क्षेत्रामध्ये चीनचा तोफखाना आणि आर्म रेजिमेंट यासह जवळपास 10 हजार सैनिक असल्याचं स्पष्ट होत आहे. कॅराकोरम पासला जोडण्याचा आपला जो रस्ता आहे तिथे चिनचे मोठ्या प्रमाणात सैनिकी कॅम्प, वाहनं आणि तोफगोळा दिसत आहे. त्यामुळे आम्ही सरकारला काही प्रश्न विचारु इच्छितो, एप्रिल, मे 2020 मध्ये चिनी सैन्याने कितीवेळा अतिक्रमण केलेलं आहे?
पंतप्रधानांनी विरोधी पक्षांच्या बैठकीत अतिशय गंभीर आणि धोकादायक वक्तव्य केलेलं आहे. ते वक्तव्य का केलं? कुणीही भारतात घुसलं नाही. एकही भारताची चौकी कुणाच्या ताब्यात नाही. हे वक्तव्य का केलं? पंतप्रधान यांनी विचारपूस करुन केलं की ते त्यांचं वक्तव्य होतं?
चिनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदींचे खूप मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यांच्यात गेल्या 5 ते 7 वर्षांत 19 वेळा भेटी झाल्या. मोदींनी जिनपिंग यांचं भारतातही स्वागत केलं आहे. मग पंतप्रधान मोदींचा जिनपिंग यांना न दुखवण्याचा काही विचार होता का?
15, 16 जून पूर्वीची जे परिस्थिती काय होती? सॅटेलाईटचे फोटो आणि इतर माहितींनुसार पंतप्रधान मोदींनी केलेला दावा साफ खोटा हे स्पष्ट झालं आहे. त्यावर प्रतिक्रया मिळणार आहे का? असे प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केले.