पुणे: राज्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या मुख्य केंद्रापैकी एक असणाऱ्या पुण्यात आता कोरोना प्रादुर्भावाचा वेग काहीसा मंदावला आहे. पुण्यातील काही भागांतील नागरिकांमध्ये हर्ड इम्युनिटी विकसित झाल्याचाही अंदाज नुकताच तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला होता. अशाचप्रकारची परिस्थिती पुणे महानगरपालिकेच्या मुख्यालयातही दिसत आहे. येथील 45 टक्के कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होऊन त्यांच्या शरीरात आपोआपच अँटीबॉडीज निर्माण झाल्याची बाब आता समोर आली आहे. (Coronavirus surges in Pune region)
‘एनआयव्ही’कडून गेल्याच आठवड्यात पुणे महानगरपालिका मुख्यालयातील कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये 45 टक्के कर्मचाऱ्यांना कोरोना होऊन ते आपोआप बरे झाल्याची बाब समोर आली. गेल्या आठ महिन्यांमध्ये महापालिकेच्या तब्बल 638 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यापैकी 38 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. मात्र, आता पालिका कर्मचाऱ्यांमधील कोरोना प्रादुर्भाव बऱ्याच अंशी नियंत्रणात आल्याचे चित्र आहे.
पुणे शहरातही काहीसे असेच चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या 15 दिवसांत शहरातील कंटेन्मेंट झोनची संख्या कमी झाली आहे. कसबा पेठ, आंबेगाव, वानवडी, लोहगाव, फुरसुंगी आणि हडपसर हे भाग वगळता इतर परिसरात कंटेन्मेंट झोनची संख्या कमी करण्यात आली आहे. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास कंटन्मेंट झोनची संख्या पुन्हा वाढू शकते. यापूर्वी 4 नोव्हेंबरला कंटेन्मेंट झोनची संख्या 13 इतकी होती. गेल्या 15 दिवसांत आठ कंटन्मेंट झोन कमी करण्यात आले आहेत.
सिरो सर्व्हेमध्ये सर्वाधिक रुग्ण सापडलेल्या पुण्यातील ‘या’ प्रभागात हर्ड इम्युनिटी विकसित झाल्याचा अंदाज
पुण्यातील पाच प्रभागांमध्ये नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले होते. यापूर्वी जुलै ते ऑगस्ट याच काळात याच प्रभागांमध्ये सिरो सर्व्हे झाला होता. तेव्हा या प्रभागांमधील जवळपास 51 टक्के लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. यापैकी लोहिया नगर या प्रभागात आता हर्ड इम्युनिटीची लक्षणे आढळून आली आहेत.
सिरो सर्व्हेमध्ये लोहिया नगरमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते. मात्र, आता या प्रभागातील कोरोना झालेल्या 85 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडिज निर्माण झाल्या आहेत. गेल्या तीन महिन्यात याठिकाणी कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे लोहिया नगरमध्ये कोरोनावर मात करणारी हर्ड इम्युनिटी विकसित झाल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे.
संबंधित बातम्या:
कोरोना मृत्यूदर शून्यावर आणण्यासाठी पुणे महापालिकेचे प्रयत्न, ऑडिट कमिटी नेमणार
Pune | 50 हजार टेस्ट किट, अडीच हजार खाटा, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी पुणे प्रशासन सज्ज
(Coronavirus surges in Pune region)