पुणे : पुण्यातील एकूण 17 जण नायडू रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी 5 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत, त्यांच्या संपर्कातील 43 जणांवर आरोग्य विभागाचं लक्ष आहे, अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर (commissioner Deepak Mhaisekars smart tips corona ) यांनी दिली. पुणे विभागातील कोरोना विषाणून बाधित आणि संशयितांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. रोज संध्याकाळी 4 वाजता जिल्हा प्रशासन कोरोनाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेणार असल्याचं म्हैसेकर म्हणाले. (commissioner Deepak Mhaisekars smart tips corona )
गर्दी टाळण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या त्या करण्याचे आदेश दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी आहेत, त्यामुळे त्यांना कारवाईचे सर्व अधिकार दिले आहेत. मीडिया आणि सोशल मीडियाला विनंती आहे की रुग्णांची ओळख दाखवू नका, असं आवाहन दीपक म्हैसेकर यांनी केलं.
हात कसे धुवावे, खोकावं कसं?
यावेळी आयुक्तांनी हात कसे धुवावे याचं एकप्रकार प्रात्यक्षिक दाखवलं. शिवाय खोकताना रुमाल कसा पकडावा, रुमाल नसेल तर हाताच्या बाह्याजवळ तोंड नेऊन कसं खोकावं हे दीपक म्हैसेकर यांनी सांगितलं. साबणाने स्वछ हात धुणे हा सर्वात चांगला पर्याय आहे. प्रवास अत्यावश्यक असेल तरच करा. गर्दी टाळा, असा सल्ला म्हैसेकर यांनी दिला.
हात धुण्याचं प्रात्यक्षिक
साबणाने दर चार तासांनी हात स्वच्छ धुवावे. हात धुताना केवळ तळव्यांना साबण लावू नका, तर बोटांच्या मधील जागा, बोटांची अग्र यांना व्यवस्थित साबण लावून किमान 20 सेकंद हात चोळून स्वच्छ धुवा. हे 20 सेकंद देणं हा सर्वात सुरक्षित आणि सोपा उपाय आहे.
जेव्हा एखादा रुग्ण खोकतो किंवा शिंकतो तेव्हाच हे विषाणू हवेतून येतात, त्याशिवाय हा विषाणू हवेतून पसरत नाही. मात्र सार्वजनिक ठिकाणी वावरताना आपले हात अन्य वस्तूंना लागल्याने आणि तेच हात आपण तोंड, नाक, डोळ्यांना लावल्यास, ते विषाणू शरिरात जाण्याची शक्यता असते. त्यामुळे हात साबणाने स्वच्छ धुणे गरजेचे आहे, असं आयुक्त म्हणाले.
खोकताना रुमालाची घडी सोडून तो तोंडावर पकडून खोका. जर रुमाल नसेल तर कोपरात हात वाकवून, बाह्या समोर घेऊन खोकावं, जेणेकरुन समोरच्या व्यक्तीपर्यंत त्याची बाधा पोहोचणार नाही, असा सल्ला आयुक्तांनी दिला.