पुणे : लॉकडाऊनच्या कालावधीत रोजगाराअभावी मजुरांची उपासमार होऊ नये, यासाठी पुणे जिल्ह्यात रोजगार हमी योजनेची (रोहयो) कामे सुरु करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील 338 ग्रामपंचायतींनी कामे सुरु केल्याने जवळपास चार हजार मजुरांना रोजगार मिळणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये सुमारे साडेतीन हजार तर पुणे जिल्ह्यात 17 हजार कंपन्यांचे कामकाज सुरु झाल्याची माहिती आहे. (Pune Employment Guarantee Scheme Work Begins amid Corona Lockdown)
पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यातील 338 ग्रामपंचायतींनी 696 कामे सुरु केली आहेत. इंदापूरमध्ये 128, जुन्नरमध्ये 92, भोरमध्ये 85, मावळमध्ये 76, शिरुरमध्ये 75, तर बारामतीमध्ये 71 कामांना सुरुवात झाली आहे. यामुळे 4041 मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.
पुणे जिल्ह्याचा रोजगार हमी योजनेचा सुमारे 106 कोटी रुपयांचा वार्षिक कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये सुमारे 25 हजार कामे प्रस्तावित आहेत.
निम्मी कामे ग्रामपंचायतींमार्फत तर उर्वरित अर्धी कामे राज्य सरकारच्या अन्य विविध यंत्रणांमार्फत केली जाणार आहेत. यानुसार ग्रामपंचायतींमार्फत वर्षभरात सुमारे साडेबारा हजार कामे केली जाणार आहेत. या कामांच्या माध्यमातून 60 हजार मजुरांना काम मिळू शकणार आहे.
पुणे जिल्ह्यातील सुरु असलेल्या कामांची तालुकानिहाय संख्या
आंबेगाव – 33
बारामती – 71
भोर – 85
दौंड – 43
हवेली – 13
इंदापूर- 128
जुन्नर – 92
खेड – 43
मावळ – 76
मुळशी – 05
पुरंदर – 21
शिरुर – 75
वेल्हे – 13
पिंपरी चिंचवडमध्ये सुमारे साडेतीन हजार तर पुणे जिल्ह्यात 17 हजार कंपन्यांचे कामकाज सुरु झाले आहे. मात्र कच्च्या माल आणि कामगारांची वाहतूक ही सर्वच कंपन्यांपुढे अडचण आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर रेड झोनमध्ये असल्यामुळे दोन्ही शहरांतील कंपन्या यापूर्वी सुरु झाल्या नव्हत्या.
उद्योग विभागाच्या पुढाकारामुळे पिंपरी चिंचवडमधील कंपन्यांचे कामकाज सुरु करण्यास राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी परवानगी दिली आहे. त्यानुसार उद्योग संचालक कार्यालयाने तेथील 3 हजार 500 कंपन्यांना तर जिल्ह्यातील 17 हजार 30 कंपन्यांना उद्योग सुरु करण्यास परवानगी दिली आहे.
टाटा मोटर्स, पद्मजी पेपर मिल, थॅरमॅक्स, एसकेएफ बेअरींग आदी कंपन्यांचेही काम सुरु झाले आहे. येत्या आठ दिवसांत पुणे शहर वगळता जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमधील उद्योगांना वेग येणार आहे. उद्योग विभागाचे विभागीय सहसंचालक सदाशिव सुरवसे यांनी यासंदर्भात माहिती दिली.
VIDEO : Lockdown Special Report | लॉकडाऊन नसता तर देशात कोरोनाचे 53 लाख रुग्ण असते?https://t.co/l0h5Q45p8w
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 18, 2020
(Pune Employment Guarantee Scheme Work Begins amid Corona Lockdown)