पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन (Punekar breaks lockdown) लागू करण्यात आला आहे. मात्र या लॉकडाऊनचं गांभीर्य पुणेकरांना नाही की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. कारण लॉकडाऊन तोडण्यात पुणेकर महाराष्ट्रात अव्वल असल्याचं समोर आलं आहे. राज्यात लॉकडाऊन झाल्यानंतर आतापर्यंत 27 हजार 432 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील सर्वाधिक गुन्हे हे पुण्यात दाखल झाले आहेत. (Punekar breaks lockdown)
पुण्यात तब्बल 3 हजार 255 लोकांवर विनाकारण फिरत असल्यानं पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. हे आकडे महाराष्ट्रात सर्वाधिक आहेत. पुण्यापाठोपाठ अहमदनगरमध्ये 2 हजार 449, नागपूर 1999, पिंपरी-चिंचवड 1993, मुंबई 1679 आणि नाशिक 1648 अशी गुन्ह्यांची नोंद झाली आहे. याशिवाय मागील तीन आठवड्यात एक हजार 886 लोकांना विविध प्रकरणात अटक झाली आहे. तर 12420 वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.
राज्यात कोरनोचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून राज्य आणि केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाऊन केला आहे. मात्र तरीही नागरिक रस्त्यावर येऊन गर्दी करत आहेत. भाजी खरेदीच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. इतकंच नाही तर विनाकारण रस्त्यावर फेरफटका मारणाऱ्यांचंही प्रमाण अधिक आहे. अशा लोकांमुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे पोलिसांनी लाठीचा प्रसाद सुरु केला. मात्र तरीही रस्त्यावरील गर्दी हटत नसल्याचं चित्र आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतीच
राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत (COVID 19 Patients Maharashtra) आहे. आज (9 एप्रिल) राज्यात 162 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 297 वर पोहोचली आहे. यात मुंबई, ठाणे आणि पुण्यातील कोरोना रुग्ण हे धक्कादायक रित्या वाढताना दिसत आहे.
आज मुंबईत 143 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. तर त्यापाठोपाठ पुणे 3, पिंपरी चिंचवड 2, यवतमाळ 1, अहमदनगर 3, ठाणे 1, नवी मुंबई 2, कल्याण डोंबिवली 4, मिरा-भाईंदर 1, वसई विरार 1, सिंधुदुर्ग 1 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.
पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या
पुण्यातही कोरोनाबाधितांचा आकडा 200 च्या वर गेला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड 5 जणांची टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 204 झाला (COVID 19 Patients Maharashtra) आहे.