नाशिक : “मालेगाव शहरात दाट वस्ती आहे (Rajesh Tope on Malegaon Corona cases). या शहरात होम क्वारंटाईन करणं शक्य नाही. त्यामुळे जिथे क्लोज कॉन्टॅक्ट आहेत त्यांना संस्थात्मक क्वारंटाईन केलंच पाहिजे. याबाबत जिल्हाधिकारांना सूचना देण्यात आली असून त्यांनी तशी व्यवस्था केली आहे. त्याचीच आम्ही पाहणी करणार आहोत”, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली (Rajesh Tope on Malegaon Corona cases).
नाशिकच्या मालेगाव तालुक्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत गृहमंत्री अनिल देशमुख, कृषीमंत्री दादा भुसेदेखील आहेत. आरोग्य मंत्र्यांनी आज आढावा बैठक घेतली. या बैठकीत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.
“मालेगावमध्ये रुग्णांचा आकडा वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर आज आढावा बैठक झाली. मालेगावात आरोग्य विभागाचे अनेक पथकं सर्वेक्षण करत आहेत. या पथकांना काही सूचना देण्यात आल्या. रुग्णांना पोर्टेबल ऑक्सिमीटर दिलं पाहिजे. त्याचबरोबर जे क्लोज कॉन्टॅक्टमध्ये असतील त्यांना हायड्रोक्सीक्लोरोक्वीन देण्याचे निर्देश आयसीएमआरनेदेखील दिला आहे. याशिवाय डायग्नोसिसबाबतही निर्देश देण्यात आला”, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मालेगावातील रुग्णालयात 100 डॉक्टर्सची आम्ही पोस्टिंग केली आहे. जे डॉक्टर पोस्टिंग केल्यानंतरही तिथे रुग्णसेवेसाठी दाखल झाले नसतील त्यांना 24 तासांचा अवधी देण्यात आला आहे. या कालावधीत ते आले नाहीत तर अशा डॉक्टर्सना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत”, असं राजेश टोपे म्हणाले.
“खासगी रुग्णालयांनी आपले रुग्णालये बंद करु नयेत. त्यांना लागणाऱ्या पीपीई किट किंवा इतर साहित्य राज्य सरकारकडून पुरवलं जाईल. मात्र, तरीही त्यांनी रुग्णालय बंद ठेवलं तर त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल”, असा इशारा आरोग्य मंत्र्यांनी दिला.
“आपल्याला मालेगाव मिशन यशस्वी करायचं आहे. मालेगावात जास्त संसर्ग झालेला नाही. काही परिवारांमध्येच कोरोनाचा संसर्ग झाला आहे. क्वारंटाईन केलेल्या रुग्णांचेच रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत. जास्त बारकाईने लक्ष दिलं तर 100 टक्के परिस्थिती आटोक्यात येईल. नाशिकमध्येही मुंबईच्या धर्तीवर टास्कफोर्स तयार करण्याची सूचना देण्यात आली”, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
‘पोलिसांवर हल्ला करणाऱ्यावर कठोर कारवाई करणार’
“संपूर्ण महाराष्ट्रात 156 ठिकाणी पोलिसांवर हल्ले झाले आहेत. जवळपास 500 ते 550 लोकांना आम्ही याप्रकरणी अटक केली आहे. जो कुणी पोलीस, डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचारी यांच्यावर हल्ला करेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. यातून कुणाचीही सूटका होणार नाही. कारण संपूर्ण यंत्रणा 24 तास काम करत आहे”, असं गृहमंत्री अनिल देशमुख यावेळी म्हणाले.
“अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सातत्याने नाशिक जिल्ह्याचा आढावा घेत आहेत. त्यांच्याकडून अनेक सूचना येत असतात. मालेगावात झालेला संसर्ग लवकर आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. त्यांना शासनाकडून संपूर्ण मदत केली जाईल”, असंदेखील गृहमंत्र्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
Corona : 30 जानेवारी ते 28 एप्रिल, भारतात कसा वाढला कोरोनाचा कहर?
पुण्यात कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी रोबो, एका क्लिकवर जेवण-पाण्यासह इतर गोष्टी मिळणार