मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करुन स्वत:चं जीवन संपवलं (Reason of Depression). सुशांतच्या आत्महत्येच्या वृत्ताने देशभरातील चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सुशांतच्या प्रत्येक चित्रपटांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र, तरीही सुशांतने वयाच्या 34 व्या वर्षी इतका टोकाचा निर्णय का घेतला असावा? असा सवाल प्रत्येकाला पडत आहे. दरम्यान, सुशांतने नैराश्यात आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र, नैराश्य म्हणजे नेमकं काय की, ज्यामुळे मनात आत्महत्येचा विचार येतो, या नैराश्याची जाणीव होणं जरुरीच आहे (Reason of Depression).
नैराश्य म्हणजे काय?
तज्ज्ञांच्या मते, नैराश्य हा एक गंभीर मानसिक आजार आहे. या मानसिक आजारातील व्यक्ती नेहमी उदास असते. आपल्या आयुष्यातील सर्व समस्यांवर मृत्यू हाच एक उपाय आहे, असा भयानक विचार नैराश्यात गेलेल्या व्यक्तीच्या मनात येतो. नैराश्यात गेलेली व्यक्ती स्वत:ला एकटं समजते. जागतिक आरोग्य संघटनेने जानेवारी महिन्यात जारी केलेल्या अहवालानुसार, जगभरात जवळपास 26 कोटी लोक नैराश्याच्या समस्येशी झुंजत आहेत.
नैराश्याची कारणं काय?
तज्ज्ञांच्या मते, एखाद्या व्यक्तीचं नैराश्यात जाण्याचे अनेक कारणं असू शकतात. लहानपणी झालेली एखादी अनपेक्षित घटनेचा बालमनावर परिणाम होतो. ही घटना आयुष्यभर मनात टोचत राहते. ड्रग्सचं वेसन, जवळच्या व्यक्तीचं अकाली निधन, रिलेशनशिपमधील समस्या, काही गोष्टी मनासारख्या न होणं, नोकरीत समस्या, कर्जाची चिंता, एखाद्या जवळच्या मित्र किंवा जवळच्या व्यक्तीने अचानक सोडून जाणं अशा अेक प्रकारच्या घटनांमुळे व्यक्ती नैराश्यात जाते.
नैराश्याची लक्षणे काय आहेत?
एखादी व्यक्ती नैराश्याला बळी पडली किंवा नैराश्यात गेली तर त्या व्यक्तीत अनेक बदल बघायला मिळतात. तज्ज्ञांच्या मते, त्या व्यक्तीला अस्वस्था वाटू लागतं. चिडचिड, राग, नाराजी, झोप न येणं, मनात सतत नकारात्मक विचार येणं, उदास वाटणं, कोणत्याही कामात लक्ष न लागणं, थकावा येणं, डोके दुखी ही सर्व नैराश्याची लक्षणे आहेत.
गरजेपेक्षा जास्त तणावात गेल्याने व्यक्तीच्या मनात आत्महत्येचा विचार येतात. तज्ज्ञांच्या मते, काही व्यक्तींमध्ये आत्महत्येचा विचार वारंवार येत-जात राहतात. मात्र, एखादी व्यक्ती या विचारांना बळी पडते आणि खरंच आत्महत्या करते. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, जगभरात दरवर्षी जवळपास 8 लाख लोक नैराश्यात जाऊन आत्महत्या करतात.
नैराश्यावर मात कशी करायची?
1. तज्ज्ञांच्या मते, कोणतीही मानसिक समस्या असल्यास तातडीने मानसोपचार तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. मात्र, काही व्यक्ती डॉक्टरांकडे जाण्यास लाजतात. लोक काय म्हणतील? असा विचार करतात. मात्र, असा विचार करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
2. मनात सतत नकारात्मक विचार येत असतील तर जवळचे व्यक्ती, मित्र, नातेवाईक यांच्याशी बोलून मन हलकं करावं.
3. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नैराश्यात गेलेल्या व्यक्तीने कधीच एकट्यात राहू नये, असं तज्ज्ञ सांगतात. सध्या लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे काही वेळा एखादी नॉर्मल व्यक्तीदेखील घरात एकटं बसलेली असताना मनाचं संतुलन गमवून बसते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या मनातही नकारात्मक विचार येतात. मात्र, अशा विचारांवर ताबा मिळवणं हेच मोठं आव्हान आहे. त्यासाठी मित्रांशी, कुटुंबियांशी चर्चा करावी.
4. तज्ज्ञांच्या मते, एकटेपणातून वाचायचं असेल तर त्यावर सर्वात रामबाण उपाय म्हणजे पुस्तकं वाचावीत, योगासने करावीत, मस्त झोपावं, मद्यपानाचं किंवा तर कसलंही व्यसन करु नये.