शिर्डी (अहमदनगर) : शिर्डीतील शिवाजी नगर भागातील हॉटेल पवनधाम येथे एका युवकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली. हॉटेलच्या रुम क्रमांक 104 मध्ये हा थरार घडला आहे. या गोळीबारात प्रतिक वाडेकर या 20 वर्षीय तरुणाचा यात मृत्यू झाला. प्रतिकच्या गळ्यावर बंदुकीची गोळी झाडण्यात आली असून आरोपी नात्यातील असल्याची माहीती पोलिस तपासात निष्पन्न झाली आहे.
घटनेतील मयत प्रतिक वाडेकर त्याचा चुलत भाऊ नितीन वाडेकर यांचेसह पाच जणांनी फ्रेश होण्यासाठी रुम भाड्याने घेतली होती. मयत प्रतिक वाडेकर राहणार लक्ष्मीनगर शिर्डी हा बाहेरगावी शिक्षणासाठी होता. चुलत्याच्या तेराव्याच्या कार्यक्रमासाठी तो शिर्डीत आला होता. रुम भाड्याने घेतल्यानंतर पाच जण रुममध्ये गेले. त्यानंतर रुममध्ये देशी पिस्तुलातून गोळी झाडत प्रतिकची हत्या करण्यात आली.
घटनेनंतर इतर चारही आरोपी हॉटेलच्या रुममधून फरार झाले. हॉटेल मालकाने प्रतिकला रुममध्ये जखमी अवस्थेत बघितल्यानंतर तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली.
दरम्यान, विभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी घटनेच गांभीर्य ओळखून घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी सनी पोपट पवार या आरोपीस ताब्यात घेतले असून अन्य तिघे फरार आहेत.
हत्येचं निश्चित कारण समजू शकलेल नसल तरी चेष्टा मस्करीत सदर घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी आरोपीच्या शोधार्थ तिन पोलिस पथके रवाना केली आहेत. शिर्डीसारख्या धार्मिक तिर्थस्थळी देशी कट्टे येतात कसे? हा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित होत असुन शिर्डीत गुन्हेगारीचा आलेख सातत्याने वाढत आहे. राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी नुकतच शिर्डी हि झिरो क्राईम सिटी करण्याची घोषणा साईदर्शनासाठी आले असता केली होती. मात्र त्यांचा हा मानस पुर्ण होईल का नाही? हे पाहण महत्वाच ठरणार आहे.